कोलकाता – प. बंगाल विधानसभा निवडणुकीत बांकुरा भागातील साल्टोरा या जागेसाठी भारतीय जनता पार्टीने 30 वर्षांच्या चंदना बाउरी यांना उमेदवारी दिली आहे. मातीच्या घरात राहणाऱ्या चंदना या आतापर्यंतच्या सगळ्यांत गरीब उमेदवार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान आता जेमतेम दहा दिवसांवर येउन ठेपले असून चंदना घरोघरी जाऊन आपला प्रचार करत आहेत. त्यांच्याकडे किती संपत्ती आहे याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्याकडे केवळ तीन बकऱ्या आहेत व तीन गायी आहेत. यातील एक गाय त्यांना त्यांच्या आईकडून मिळाली आहे. मातीच्या एका कच्च्या घरात त्या राहतात आणि त्या घरात पाणीही येत नाही. घरात शौचालयही नसल्याचे प्रसिध्द झाले आहे. त्यांच्याकडे रोख आणि बॅंक खात्यातील असे मिळून केवळ 31 हजार रूपये आहेत. त्यांच्या पतीचे नाव श्रावण राजमिस्त्री आहे. ते 400 रूपये रोज याप्रमाणे मजुरीचे काम करतात. चंदनाही मजुरीचे काम करतात आणि पती व पत्नी दोघांकडेही मनरेगाचे कार्ड आहे. गेल्या वर्षी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजने अंतर्गत त्यांना 60 हजार रूपये मिळाले होते व त्यातूनच त्यांनी दोन खोल्या बांधल्या असल्याचे चंदना यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
भारतीय जनता पार्टीसारख्या राष्ट्रीय आणि केंद्रातील सत्ताधारी पक्षाने त्यांना उमेदवारी दिली हेच त्यांचे मोठे यश असल्याचे मानले जाते आहे. मात्र पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्या आणि प्रामाणिकपणामुळेच आपल्याला ही संधी मिळाल्याचाही त्यांचा दावा आहे. रोज सकाळी 8 वाजचा भगवी साडी नेसून त्या प्रचाराला निघतात व त्यांचे मूल यावेळी त्यांच्या कडेवर असते. तृणमूल कॉंग्रेस हा भ्रष्ट पक्ष असून त्यांनी कोणताच विकास केला नाही हा त्यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असतो. केंद्र सरकारकडून विकासासाठी जो पैसा येतो तोही हा पक्ष गरीबांपर्यंत पोहोचू देत नाही. आवास योजनेपासून शौचालय योजनेपर्यंत ज्या ज्या योजनांसाठी पैसे आले ते सगळे पैसे तृणमूलचे लोकच बळकावतात असा त्यांचा आरोप आहे.