पुणे – प्रत्येक सदनिकाधारकाला मालमत्तेचा महत्त्वाचा पुरावा असलेला प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या प्रस्तावास शासनाने मान्यता दिल्याने भूकंप, पूर आदी नैसर्गिक आपत्तीमध्ये काही दुर्घटना घडल्यास त्या जागेवर संबंधित व्यक्तीचा हक्क कायम राहणार आहे. प्रॉपर्टी कार्डमुळे व्यवहारांमध्ये पादर्शकता येणार आहे.
सदनिकांच्या बाबतीत मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी महापालिकेकडे कर भरल्याची पावती आणि खरेदी-विक्री करारनामा एवढाचा दस्त उपलब्ध असतो. ज्या जागेवर इमारत उभारली आहे. त्या जागेच्या प्रॉपर्टी कार्डवर मात्र गृहनिर्माण सोसायटी अथवा अपार्टमेंट यांची नोंद असते. तसेच सर्व सदनिका धारकांची एकत्रित नावे त्यावर असतात. त्यामुळे एका व्यक्तीने कर्ज घेतले तरी प्रॉपर्टी कार्डवर इतर हक्कामध्ये याचा उल्लेख असतो. त्यामुळे हा बोजा प्रॉपटी कार्ड नोंदविण्यात येतो. प्रॉपटी कार्डवर हा बोजा नोंदविण्यात येत असल्याने काही वेळेस त्याचा त्रास बाकीच्या सदस्यांनाही सहन करावा लागतो.
या सर्व पार्श्वभूमीवर इमारतींना प्रॉपर्टीकार्ड देण्याचा प्रस्ताव भूमि अभिलेख विभागाकडून तयार करण्यात होता. मुख्य प्रॉपर्टी व्यतिरिक्त प्रत्येक सदनिका धारकास पुरवणी प्रॉपर्टी कार्ड देण्याची शिफारस त्यामध्ये करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला होता. बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. त्यामुळे एखाद्या गृहप्रकल्पातील अथवा सोसायटीतील ज्या सदनिका धारकाने सदनिका तारण ठेवली असेल अथवा त्यावर कर्ज घेतले असेल त्याची नोंद पुरवणी प्रॉपर्टी कार्डवर घेतली जाणार आहे.
अत्यंत महत्त्वाचा निर्णय…
सदनिकाधारकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण हा निर्णय झाला आहे. प्रत्येक सदनिकाधारकाला वैयक्तिक प्रॉपर्टी कार्ड यामुळे मिळणार आहे. त्यामुळे कर्ज घेणे, विक्री करणे सोयीचे होणारे आहे. तर खरेदीरालादेखील या प्रॉपर्टी कार्डवरून सदनिकेची सर्व माहिती एकाच वेळी मिळणार असल्याचे भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक किशोर तवरेज यांनी सांगितले.