सातबारा उतारा होणार बंद : पुणे पालिका हद्दीत 1997 मध्ये झाली समाविष्ट
पुणे – पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांतील मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या कामाला गती मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात बाणेर, बालेवाडी, महमंदवाडी आणि खराडी या चार गावांची मोजणी करण्यात येणार आहे. येत्या महिनाभरात प्रत्यक्ष मिळकतींचे सर्वेक्षण करून प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे. एकदा प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यानंतर या गावांमधील सातबारा उतारा बंद होणार आहे, अशी माहिती भूमि अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांतील मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा प्रकल्प गेल्या दहा वर्षांपासून रखडलेला आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत 1997 मध्ये गावे समाविष्ट करण्यात आली. या गावांचे सर्वेक्षण करून तेथील मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाला 2 कोटी रुपयांचा निधी महापालिकेने दिला होता. त्यानुसार 2007 मध्ये समाविष्ट गावांतील सर्व मिळकतींचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. मात्र, त्यास परवानगी देण्यास राज्य सरकारकडून विलंब झाला, त्यामुळे हे काम थांबले होते. राज्य सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतरही त्यात अनेक अडचणी निर्माण झाल्याने हे काम थांबले होते. ते आता पूर्ण करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे.
परंतु, गेल्या 10 वर्षांत या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत, त्यामुळे या गावांचे नव्याने सर्वेक्षण करावे लागणार आहे. त्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च पाहता गेल्यावर्षी पीएमआरडीएकडून या सर्व गावांचे एरियल सर्वेक्षण करण्यात आले आहे. गावांच्या हद्दी कायम आहेत. त्यामुळे या सर्वेक्षणाची मदत घेऊन जुन्या नकाशावर सुपर इम्पोज करण्याचा प्रयोग बाणेरमध्ये राबविण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाल्याने समाविष्ट गावांतील मोजणी या प्रकारे करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात चार गावांतील मिळकतींची मोजणी झाल्यानंतर उर्वरित गावांतील मिळकतींची मोजणी करून प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार असल्याचे भूमि अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.