पिंपरी – पिंपरी-चिंचवडकरांनी बाप्पांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. मात्र, करोनाचे संकट अद्याप टळले नसल्याने गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांना काही नियम पाळावे लागणार आहेत. उत्सवा दरम्यान खाकीची करडी नजर राहणार आहे. त्यासाठी मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी उद्योगनगरी सज्ज झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी गणेश मंडळांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. पोलीस दप्तरी एक हजार 856 सार्वजनिक मंडळांची नोंद आहे. गणेशोत्सवा दरम्यान बंदोबस्त देखरेख अधिकारी म्हणून अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे हे काम पाहणार आहेत. तर, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर आणि परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त आनंद भोईटे हे यांनी आपल्या हद्दीत बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
पाच सहायक पोलीस आयुक्त, 28 पोलीस निरीक्षक, 106 उपनिरीक्षक / सहायक निरीक्षक, 862 कमर्चारी, होमगार्ड आणि राज्य राखीव दलाची तुकडी असा बंदोबस्त पुरवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त नियंत्रण कक्ष येथे देखील एक राज्य राखीव दलाची तुकडी राहणार आहे. आवश्यकतेनुसार ही तुकडी पाठवण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त कोठेही वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांचाही वेगळा बंदोबस्त असणार आहे.
पोलीस आयुक्तालयाची पाच पथके
करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता निर्बंधाचे पालन होते का नाही, याची पाहणी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाची पाच पथके शहरात गस्त घालणार आहेत. याव्यतिरिक्त स्थानिक पोलिसांचे एक पथक देखील हद्दीत गस्त घालणार आहे. ही पथके नियमभंग करणाऱ्या सार्वजनिक मंडळांसह रस्त्याने फिरणाऱ्या नागरिकांवर देखील करवाई करणार आहेत.