मुंबई : राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
अन्न व औषध प्रशासन ऑक्सिजन पुरवठ्याचे विवरणपत्र तयार करून ते उत्पादक व जिल्ह्यांना नियमितपणे देत असून दिनांक-29 एप्रिल साठी 1636 टनाचे विवरणपत्र देण्यात आलेले आहे. राज्यामध्ये मेडीकल ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या आयनॉक्स इंडिया, लींडे, एअर लिक्विड, टायो निप्पॉन, जे एस डब्ल्यू या पाच प्रमुख कंपन्या आहेत. याव्यतिरिक्त देखील अनेक छोटे उत्पादक आहेत त्यांचे देखील उत्पादन वाढले आहे या सर्व उत्पादकांचे मिळून सुमारे 1270 टन इतके ऑक्सिजन उत्पादन रोज होत आहे. केंद्राने 1784 टन ऑक्सिजन कोटा महाराष्ट्रासाठी निश्चित केला आहे. त्यात राज्यातील व राज्याबाहेरील उत्पादकांचा समावेश आहे. देशात सध्या प्रामुख्याने छत्तीसगड, कर्नाटका व गुजरात राज्यांमधून सुद्धा साधारणत: 200 ते 250 टन ऑक्सिजन दररोज प्राप्त होत आहे. विशाखापट्टणम येथून 7 टॅंकर घेऊन निघालेल्या विशेष रेल्वेद्वारा दि. 24 एप्रिल रोजी 105 टन ऑक्सिजन राज्यासाठी प्राप्त झाला.
राज्यात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी असलेल्या टॅंकरची कमतरता लक्षात घेता नायट्रोजनसाठी असलेल्या टॅंकर यांचे ऑक्सिजन टॅंकरमध्ये रूपांतर करणे सुरू आहे. त्यानुसार आतापर्यंत 680 टन ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढली आहे आणि अजून 350 ते 400 टन वाहन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन मे.सिप्ला, हेटेरो, झायडस, मायलन, सन फार्मा, डॉ.रेड्डीज व जुबिलंट या औषध उत्पादक कंपन्यामार्फत करण्यात येते. राज्यात सिप्ला कंपनीकडून उत्पादन होते.या उत्पादकांच्या प्रामुख्याने भिवंडी, पुणे व नागपूर येथील डेपोमधून या औषधाचा पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्रासाठी वरील सात उत्पादक मिळून एकूण 4,35,000 रेमडेसिवीरचा साठा दिनांक- 21 ते 30 एप्रिल या कालावधीत करण्याबाबत निर्देश दिले आहेत. दिनांक 28 एप्रिल रोजी राज्यात 28945 इतका साठा वितरीत झाला आहे. दिनांक 29 एप्रिल रोजीच्या वितरणासाठी अंदाजे 30,000 इतका साठा वितरणासाठी उपलब्ध होणे अपेक्षित आहे. अशी माहिती डॉ. शिंगणे यांनी दिली आहे.