सकाळी विरोधी प्रचार, सायंकाळी एकत्र चहा!

वैयक्‍तिक आयुष्याप्रमाणेच राजकारणातही कुणीच कुणाचं कायमचं वैरी नसतं, असं म्हणतात. किंबहुना, भारतीय लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या नेत्यांमध्ये राजकारणापलीकडे नेहमीच सुसंवादाची, मैत्रीची, स्नेहबंधांची परंपरा राहिलेली आहे. काही वेळा याचे रुपांतर “मिलीभगत’मध्येही झालेले दिसते तो भाग अलहिदा! पण अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते आमदार-खासदारकीच्या निवडणुकांपर्यंत परस्परांवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढणारे, चिखलफेक करणारे नेते एकमेकांच्या घरी जेवणही करतात. अशाच मैत्रीचा-स्नेहाचा एक किस्सा.

1957 च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान रायबरेली मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. समाजवादी पक्षाकडून डॉ. राम मनोहर लोहिया यांचे खासगी सचिव नंदकिशोर आणि कॉंग्रेसकडून जवाहरलाल नेहरूंचे जावई फिरोज गांधी यांच्यात चुरशीचा सामना या मतदारसंघात रंगला होता. त्यावेळी लोहियांकडे केवळ 300 रुपये होते ते त्यांनी नंदकिशोरला दिले. पण प्रत्यक्षात निवडणुकांसाठीची अनामत रक्‍कम 500 रुपये होती. नंदकिशोर यांच्या समर्थकांनी उर्वरित रकमेसाठी पैसे जमवायला सुरुवात केली. त्यावेळी फिरोज आणि इंदिरा गांधींनी नंदकिशोर यांना बोलावून “अनामत रकमेसाठी पैसे हवे असतील तर माझ्याकडून घ्या’ असे सांगितले. यावर अचंबित झालेले नंदकिशोर म्हणाले, “मी तुमच्याविरोधातच निवडणूक लढतोय आणि तुमच्याकडूनच पैसे घ्यायचे, हे मला शोभतही नाही आणि पटतही नाही.

यावर फिरोज गांधीं म्हणाले की, तुम्ही प्रचारात बाजी मारली आहे. अनामत रकमेच्या या उदाहरणातून तुम्ही गरीब, मागास आणि दुर्बल वर्गांना संदेश दिला आहे की तुम्ही त्यांचे प्रतिनिधी आहात. सायंकाळी आमच्याकडे चहासाठी या.’

नंदकिशोर यांनी तो चहाचा प्रस्ताव स्वीकारला. यानंतर फिरोज गांधी रोज त्यांना बोलावत असत. मग सकाळी प्रचारसभा होत असत आणि सायंकाळी हे दोघे परस्परांचे विरोधी उमेदवार एकत्र चहा-कॉफी घेत असत.

Leave A Reply

Your email address will not be published.