पुणे – सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, उमेदवारांनी पदयात्रा, मतदारांच्या भेटीगाठींचा धडाका सुरू केला आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांत प्रचारयंत्रणेचे तंत्रही बदलले असून, सगळ्याच उमेदवारांची भिस्त सोशल मीडियाच्या अवलंबून असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उमेदवारांनी सोशल मीडिया फ्रेंडली असलेल्या तरुणाईच्याच हातात प्रचाराची सूत्रे दिली आहेत. त्यामुळे तरुणांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे.
मागील लोकसभा निवडणुकांपासून ते आत्ताच्या विधानसभा प्रचारात तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लोकशाहीच्या उत्सवात त्यांचा सहभाग ही सकारात्मक बाब आहे. जवळपास सर्वच नागरिकांकडे स्मार्टफोन उपलब्ध असल्याने उमेदवारांचे म्हणणे प्रत्यक्ष मतदारापर्यंत पोहोचत आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात प्रचारासाठी मेसेजेस, टेलिकॉलिंगचा वापर होत आहे.
कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी टेलिकॉलिंग प्रभावी ठरत असल्याने सर्वच पक्षांचे उमेदवार या यंत्रणेचा वापर करत आहेत. एका विधानसभा कार्यक्षेत्रात साधारण ६० ते ८० जणांची टीम टेलिकॉलिंगसाठी नेमली जाते. त्या माध्यमातून पक्षाचे नाव, चिन्ह, उमेदवाराबद्दल माहिती, निवडणुकीची तारीख, व्होटिंग मशिनवर उमेदवाराचा बटण क्रमांक अशी विविध माहिती दिली जाते.
दिवसाला साधारणत: २५० ते ३०० मतदारांना फोन करून ही माहिती दिली जाते. टेलिकॉलिंगसाठी तरुणींना प्राधान्य दिले जात आहे. साधारण २० ते ३० दिवसांसाठी १५ ते २० हजार रुपये दिले जातात. त्यामुळे निवडणुकीच्या काळात उच्चशिक्षित तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.
मतदानाच्या दिवसापूर्वी प्रत्येक मतदारापर्यंत व्होटर स्लिप पोहोचावी, यासाठी उमेदवारांकडून काळजी घेतली जाते. एका विधानसभा मतदारसंघात व्होटर स्लिप वाटपासाठी कार्यकर्त्यांसह ४० ते ५० लोकांची आवश्यकता असते. त्यांना दिवसाला ३०० ते ५०० रुपये मानधनापोटी दिले जातात.
निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक बूथवर बसण्यासाठी सुशिक्षित तरुणांची आवश्यकता असते. सकाळी सात ते सायंकाळी मतदान होईपर्यंत त्यांचे काम असते. निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहोचण्याचे सर्वांत चांगले माध्यम म्हणजे पॅम्प्लेट. त्या माध्यमातूनही तरुणांना तात्पुरता रोजगार मिळत आहे.
वेगवान जनसंपर्क
संबंधित पक्षाच्या उमेदवाराचे प्रचाराचे नियोजन कसे असेल, परिसरात उमेदवार प्रचारासाठी किती वाजता येणार, याची सर्व माहिती सोशल मीडियातून पक्षाच्या ग्रुपमधून तत्काळ कार्यकर्त्यांना दिली जाते. आपल्या नेत्याचा एखादा व्हिडिओ अथवा प्रमुख नेत्याचे थोडक्यात भाषण सोशल मीडियातून प्रसारीत करून माहोल तयार केला जात आहे.