धोकादायक वस्त्यांचे तातडीने स्थलांतर; नातेवाईकांचे अश्रू पुसताना मुख्यमंत्र्यांची ग्वाही

तळीये  – धोकादायक अवस्थेत असणाऱ्या वस्त्यांच्या सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावे लागेल. त्यासाठी आराखडा तयार करून लवकरात लवकर त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे ठोस आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.

तळीये येथे गुरूवारी दरड कोसळून गावातील सुमारे 35 कुटूंबे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी महाड दौरा करत या घटनास्थळाला भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांत्री बोलत होते. ते म्हणाले, ज्याला अक्रीत म्हणावे अशा घटना घडत आहेत. त्या अनपेक्षित आहेत. मात्र, आता आपण त्यातून शहाणे होण्याची वेळ आली आहे.

गेल्या काही वर्षांत पावसाळ्याची सुरवातच चक्रीवादळाने होते. त्यातून सावरण्यासाठी माणसे वाचवण्यासाठी धावपळ होते. त्यातच या सारखे अक्रीत बघितल्यानंतर ज्या ज्या वस्त्या अशा धोकादायक आहेत.

डोंगर, दऱ्या, कपारीत आणि डोंगरांच्या पायथ्याशी आहेत, त्यांचं सुरक्षित ठिकाणी पुर्नवसन हे आपल्याला करावेच लागेल. त्यासाठी सरकार गांभीर्याने केवळ विचार करणार नाही, तर आराखडा तयार करेल आणि लवकरात लवकर या अशा सगळ्या वस्त्यांचे चांगल्या ठिकणी पुनर्वसन करू, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. “तुम्ही दुःखातून सावरा, बाकीची काळजी आम्ही घेऊ’ अशी ग्वाही त्यांनी दिली. ठाकरे यांच्यासह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री आदिती तटकरे तसेच खासदार सुनील तटकरे उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.