नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासह 12 राज्यांत आणि पुद्दुचेरी या एका केंद्रशासित प्रदेशात मतदान होणार आहे. त्या टप्प्यात एकूण 96 मतदारसंघ मतदानाला सामोरे जातील.
उत्तरप्रदेश (8 जागा), तामीळनाडू (38 जागा), कर्नाटक (14 जागा), बिहार (5 जागा), पश्चिम बंगाल (3 जागा) या राजकीयदृष्ट्या महत्वाच्या राज्यांतही दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल. त्याशिवाय, ओडिशातील लोकसभेच्या 5 आणि विधानसभेच्या 35 जागांसाठी मतदार त्यांचा हक्क बजावतील. दुसऱ्या टप्प्यात जुअल ओराम, सदानंद गौडा आणि पोन राधाकृष्णन या केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरेल. त्याशिवाय, रिंगणात उतरलेल्या इतर प्रमुख उमेदवारांमध्ये माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा, वीरप्पा मोईली आणि राज बब्बर हे कॉंग्रेस नेते, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूक अब्दुल्ला, भाजपच्या उमेदवार आणि अभिनेत्री हेमा मालिनी तसेच दयानिधी मारन, ए.राजा आणि कनिमोळी या द्रमुकच्या नेत्यांचा समावेश आहे.