जिल्ह्यात उडणार प्रचाराचा धुराळा

सातारा – विधानसभा निवडणुकीतून सातारा जिल्ह्यात राजकीय मांड पक्‍की करण्यासाठी भाजपची तर प्रतिष्ठा वाचवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची धडपड सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दि. 17 रोजी सातारा येथे सैनिक स्कूलच्या मैदानावर सभा होणार आहे तर राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या पाच सभांचे नियोजन केले आहे.

शरद पवार यांची सभा दि. 18 रोजी जिल्हा परिषद मैदानावर होणार आहे. स्टार कॅम्पेनर्सच्या सभांनी जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार आहे. विधानसभेच्या आखाड्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी दुपारी तीन वाजता संपली. त्यानंतर काही उमेदवारांनी दसऱ्याचा मुहूर्त साधला. सणाचे वातावरण असल्यामुळे प्रचाराची फक्त सुरवात झाली. मात्र, बुधवारपासून उमेदवारांनी पदयात्रा, कोपरा सभा याद्वारे मतदारांशी संपर्क साधण्यास जोरदार वेळापत्रक तयार केले आहे.

राज्यस्तरियच नव्हे तर राष्ट्रीय नेतेही महाराष्ट्राच्या निवडणूक आखाडयात उतरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात दहा तर गृहमंत्री अमित शहा यांच्या अठरा सभा होतील, असे नियोजन भाजपने केले आहे. भाजपच्या या 28 सभांपैकी नरेंद्र मोदी यांची एक सभा 17 रोजी साताऱ्यात तर अमित शहा यांची एक सभा 18 रोजी कराडात घेण्याचे नियोजन सुरू आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्टार कॅम्पेंनर म्हणून शरद पवार यांच्याच पाच सभांचे आयोजन सातारा जिल्हयात केले आहे. पवारांच्या तीन सभा कराड उत्तर, वाई, कोरेगाव येथे होण्याची चिन्हे आहेत. साताऱ्यात दिनांक 18 रोजी जिल्हा परिषदेच्या मैदानावर शरद पवार जंगी सभा घेणार आहेत. याशिवाय अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही प्रचार दौऱ्यात उतरवले जाणार आहे. त्यामुळे सातारा जिल्हयाच्या राजकारणाचे पुढील दहा दिवस प्रचंड रणधुमाळीचे असणार आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले होते. विधानसभेच्या आखाड्यात ईडीचा डाव पवारांनी उलटवत राष्ट्रवादीची घसरलेली गाडी रुळावर आणली. आता मोदी यांच्या टीकेची धनी कोण होणार आणि प्रचारांचा रंग कसा बदलत जाणार, याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.