प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

सातारा – लोकसभेच्या सातारा व माढा मतदार संघासाठी मंगळवार दि. 23 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायं. 6 वाजेपर्यंत मतदान होणार असून मतदानापूर्वी 48 तास अगोदर म्हणजेच आज दि. 21 एप्रिल रोजी सायं. 6 वा. पासून निवडणुकीचा कोणताही प्रचार करता येणार नाही तसेच सभाही घेता येणार नाही. निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणूक प्रक्रिया विना अडथळा भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी सातारा व माढा लोकसभा मतदार संघात दि. 21 एप्रिल रोजी सायं. 6 वा. पासून दि. 23 एप्रिल मतदान संपेपर्यंत 1973 चे कमल 144 मधील तरतुदीनुसार मनाई आदेश लागू केले आहे, त्यामुळे आजपासून प्रचाराच्या तोफा थंडावणार आहोत.विना अडथळा भयमुक्त वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी कमल 144 लागू – जिल्हाधिकारी कलम 144 नुसार सातारा व माढा लोकसभा मतदार संघाच्या क्षेत्रात पुढील कृती करण्यास मनाई केली आहे.

बेकायदेशीर जमाव जमविणे आणि सार्वजनिक सभा, बैठका घेणे अगर निवडणूक प्रचार करणे. तसेच पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येणेचे मनाई आदेश आहे. सातारा जिल्ह्यातील माढा व सातारा या दोन लोकसभा मतदार संघामध्ये प्रचाराकरीता आलेले विविध राजकीय पक्षातील नेते, कार्यकर्ते जे सदर मतदार संघातील मतदाता नसतील त्यांनी दि. 21 एप्रिल 2019 रोजीचे सायंकाळी 6.00 वा. नंतर सातारा जिल्ह्यातील माढा व सातारा या दोन लोकसभा मतदार संघाचे कार्यक्षेत्रात वास्तव्य करणे, मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरामध्ये राजकीय पक्षांचे बुथ स्थापित करणे, प्रचार साहित्य बाळगणे अथवा वापरणे.

मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीने मोबाईल फोन, कॉडलेसफोन, वायरलेस सेट इत्यादी, बाळगणे, वापरणे अथवा मतदानाच्या गोपनियतेचा भंग होईल अशी कृती करणे, मतदार केंद्रातील मतदान प्रतिनिधी वा इतर प्रतिनिधी यांनी मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरणे किवा फोटो काढणे अथवा चित्रीकरण करणे तसेच मतदानाच्या गोपनियतेचा भंग होईल अशी कृती करणे, मतदान केंद्राच्या 100 मिटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही प्रकारची शस्त्रे (शस्त्र अधिनियम 1959 मध्ये नमूद केले प्रमाणे) बाळगणेस (सुरक्षेच्या कारणास्तव नेमलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी वगळून).

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने मतदानादिवशी मतदान केंद्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या ठिकाणी तसेच मतदान केंद्रापासून 100 मिटरचे परिसरात कोणाही व्यक्तीला पुढील कृत्ये करता येणार नाही कोणत्याही स्वरुपात निवडणूक विषयक प्रचार करणे, मतदारांना धमकविणे, मतदारावर ठराविक उमेदवाराच मतदान करण्यासाठी दबाव टकाणे, मतदाराचा मतदानाचा हक्क बजावू नये, यासाठी कोणत्याही मार्गाने दबाव टाकणे, अशी कोणतीही कृत्ये करता येणार नाहीत. तथापि, वरील आदेश मतदानाकरीता घरोघरी जावून भेटी देण्यासाठी लागू राहणार नाही. या आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारकळविले आहे.

जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू

अपर जिल्हादंडाधिकारी सुनिल थोरवे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्राप्त अधिकारास अधिन राहून संपूर्ण सातारा जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू केले आहेत. हे आदेश दि. 30 एप्रिल 2019 रोजीचे 24.00 वा. पर्यंत अंमलात राहतील. या आदेशातून सण, यात्रा व उत्सवाचे कार्यक्रम वगळण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.