महापालिका पदोन्नती समितीची बैठक : कनिष्ठ अभियंता ते शहर अभियंता पदावर बढती
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागातील सहशहर अभियंता ते कनिष्ठ अभियंता, आरेखक या पदावर 26 जणांना पदोन्नती देण्यात येणार आहे. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच पदोन्नती समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागातील डिग्री आणि डिप्लोमाधारकांचा वाद मिटवण्यासाठी एकास एक पदानुसार पदोन्नती देण्यात आल्या आहेत. मात्र, त्याला आयुक्तांची अंतिम मान्यता घेतल्यानंतरच संबंधिताच्या पदोन्नतीचे आदेश प्रशासनाकडून देण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागातून आरेखक, कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता, सहशहर अभियंता आणि शहर अभियंता पदाबाबत खुल्या प्रवर्गातून पदोन्नती देण्यासाठी महापालिकेच्या पदोन्नती समितीत 26 जणांचे प्रस्ताव प्रशासनाने दाखल केले होते. त्यात आरक्षित एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गातील पदोन्नती जागा राखीव ठेवून पदोन्नती करण्यात आलेली नाही. महापालिकेतील मंजूर असलेल्या रिक्त पदांवर तात्काळ पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी अभियंता वर्गातून सतत होत आहे.
त्यानुसार प्रशासन विभागाने हे 26 जणांचे प्रस्ताव तयार केलेले होते. त्यात सहशहर अभियंता प्रत्येकी एक, कार्यकारी अभियंता पदाच्या 10 पैकी 6 जागा, उपअभियंता पदाच्या 17 पैकी 10 जागा, कनिष्ठ अभियंता पदाच्या 13 पैकी 8 जागा, आरेखक 2 जागा अशा एकूण 26 पदांच्या पदोन्नती समितीत निर्णय घेण्यात आला आहे. अभियांत्रिकीच्या पदोन्नतीतील आरक्षित जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यात कार्यकारी अभियंता 4 जागा, उपअभियंता 7 जागा, कनिष्ठ अभियंता 5 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या जागा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे भरलेल्या नाहीत.
महापालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग एक ते चार मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली डीपीसी समिती कार्यरत आहे. या समितीत आयुक्त, प्रशासन विभागाचे अतिरिक्त आयुक्त, सहायक आयुक्त, मुख्य लेखाधिकारी, मुख्य लेखा परिक्षक, मागासवर्गीय प्रतिनिधींचा समावेश असतो. त्या समितीची बैठक वारंवार पुढे ढकलली जात असल्याने अभियांत्रिकी विभागाच्या पदोन्नत्या रखडल्या होत्या.