राज्यमंत्र्यांच्या प्रयत्नातून 90 कोटी मिळाल्याने
लक्ष्मी घड्याळात नाही तर कमळात
नगराध्यक्षा सुरेखा जाधव म्हणाल्या की, लक्ष्मी ही देवता घड्याळात किंवा हाताच्या पंजावर नाही येत ती फक्त कमळात येते. त्यामुळे आपल्या मावळच्या विकासासाठी आणि मावळात भरघोस निधी आणण्यासाठी आपल्याला कमळाला मतदान करायचे आहे, असे त्यांनी नागरिकांना सांगितले.
लोणावळा – गेली 25 वर्षे मी नगरसेविका आणि दोन वेळा नगराध्यक्षपद लोणावळा शहरात भूषवले आहे. परंतु जेव्हा शिवसेना- भाजपा युतीचे सरकार तालुक्यात आले, तेव्हा राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून लोणावळा शहराला 90 कोटींचा निधी उपलब्ध झाला. यामुळे आम्ही आमच्या लोणावळा शहराचा विकास करू शकलो, असे मत लोणावळा शहराच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी व्यक्त केले आहे.
बुधवारी (दि. 16) सकाळी वलवन येथे राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रचार रॅलीचे “जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणांनी जोरदार पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. मंगळवारी तळेगाव दाभाडे येथे झालेल्या मुख्यमंत्री यांच्या सभेचे पडसाद लोणावळा शहरात बुधवारी पाहण्यास मिळाले. अनेक नागरिक आजच्या प्रचारात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. आज वलवन, पांगोळी, तुंगार्ली, इंदिरानगर, गवळीवाडा, नांगरगाव, जुना खंडाळा, भांगरवाडी आदी परिसरामध्ये जोरदार प्रचाराचे वातावरण दिसून आले. राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रचारामुळे संपूर्ण लोणावळा शहर भाजपमय झाल्याचे चित्र दिसत होते.
नगराध्यक्षा जाधव यांनी बुधवारी प्रचाराची धुरा सांभाळली. आमच्या शहराचा राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केलेला विकास हा तालुक्याला मिळणाऱ्या मंत्रीपदाची साक्ष आहे. कोणी कितीही खोट्या थापा मारल्या तरी लोणावळा शहरातून राज्यमंत्री बाळा भेगडे यांना नक्कीच आघाडी मिळणार हा आमचा विश्वास आहे.
लोणावळा शहरात राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून शहरासाठी पाणी योजना, कचरा डेपो, उड्डाणपूल, तळ्याचे काम, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळात अस्तित्वात नसलेल्या अनेक रस्त्यांची कामे ज्यामुळे अनेक वाड्या-वस्त्या जोडल्या गेल्या अशी अनेक विकासकामे करण्यात आली.