नवी दिल्ली – माहिती अधिकाराअंतर्गत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तर न देणार्या राजकीय पक्षांविरोधातील लढाईचे नेतृत्व करणारे प्रख्यात माहिती अधिकार कार्यकर्ते आर के जैन यांचे कोविड-१९ व इतर शारीरिक व्याधींमुळे आज निधन झाले. ते ७० वर्षांचे होते.
जैन हे सेंटॅक्स पब्लिकेशनचे व एक्साईज लॉ टाइम्सचे संपादक होते. त्यांनी केंद्रीय माहिती आयोगाच्या (सीआयसी) पूर्ण पीठाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या सर्व राष्ट्रीय पक्षांविरोधात तक्रार दाखल केली होती. पीठाने दिलेल्या आदेशानुसार सर्व राजकीय पक्षांना माहिती अधिकाराच्या कक्षेत आणण्यात आलेलं.
जैन यांच्या निधनाबाबत माहिती देताना त्यांचे पुत्र नवनीत यांनी, “प्रथम त्यांना कोविड-१९ विषाणूची बाधा झाली. त्यानंतर नॉन-कोविडची गुंतागुंत वाढत गेली, यामुळे सोमवारी संध्याकाळी त्यांचे अनेक अवयव निकामी झाले.” अशी माहिती दिली.
केंद्रीय माहिती आयोगाच्या पूर्ण खंडपीठाने कॉंग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, सीपीआय, माकप आणि बसपा या सहा राष्ट्रीय पक्षांना ३ जून २०१३ रोजी सुभाष जैन नामक एका माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या याचिकेवर सुनावणी करताना माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आणले होते.
मात्र जैन आणि अग्रवाल यांनी दाखल केलेल्या आरटीआय अर्जांना प्रतिसाद न देत या पक्षांनी आयोगाच्या निर्देशांचे पालन केले नाही. यानंतर जैन यांनी या पक्षांविरोधात सीआयसीकडे तक्रार दाखल केली होती.
तेथेही सुनावणी न झाल्याने त्यांनी अखेर दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सीआयसीला सुनावणी सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते, परंतु हे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. जैन यांनी, उत्पादन शुल्क व सीमाशुल्क विभागाशी संबंधित अनेक आरटीआय अर्जही सीआयसीमध्ये दाखल केले होते.
जैन यांच्या जाण्याने पारदर्शकतेसाठी लढा देणाऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.