पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- विधानसभेची पायरी चढण्यासाठी इच्छुकांकडून उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवलेले असतानाच सोशल मीडियावर पक्षाच्या नावाने उमेदवारी जाहीर झाल्याच्या बनावट उमेदवार याद्यांचा सुळसुळाट झाला आहे.
दोन दिवसांपूर्वी भाजपच्या २० उमेदवारांची घोषणा असलेली बनावट यादी व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी रात्री काँग्रेसच्या २० उमेदवारांची यादी व्हायरल झाली.
त्यामुळे सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर पक्षाकडून सोशल मीडियावरूनच ही यादी बनावट असल्याचे जाहीर करण्यात आले. राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून, आचारसंहिताही लागू झाली आहे.
त्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटप सुरू असून, काही जागांवर अद्यापही तिढा आहे. दोन्ही बाजूला काही जागांवर इच्छुकांची संख्या जास्त असल्याने काही जागांची मागणी महायुती आणि महाविकास आघाडीत तीनही पक्ष करत आहेत.
त्यामुळे बंडखोरीसह वाद टाळण्यासाठी पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्याबाबत काळजी घेतली जात आहे. त्यापूर्वी नाराजांची मनधरणीही सुरू आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी भाजपची राज्यातील पहिली यादी सोशल मीडियावर जाहीर झाली.
यात नागपूर, पुण्यासह राज्यातील इतर काही जागांवरील उमेदवारांची नावे होती. त्यानंतर काही वेळातच ही यादी बनावट असल्याचे समोर आले.
ही घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री काॅंग्रेसच्या उमेदवारांची अशीच यादी सोशल मीडियावर झळकली. त्यात पुणे आणि नागपूरमधील उमेदवारांचा समावेश होता. त्यानंतर रात्री उशिरा पक्षाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून ही यादी बनावट असल्याचे जाहीर करण्यात आले.
खोडसाळपणाचा उमेदवारांना धसका?
बनावट यादीसह सोशल मीडियावर काही माध्यमांच्या नावाचा वापर करून उमेदवारी जाहीर झाल्याचे स्क्रीनशाॅटही व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढत आहे.
प्रामुख्याने एखाद्या उमेदवाराच्या विरोधात असे व्हिडिओ तयार करून त्यांच्याच मतदारसंघात व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे अशा बनावट याद्या, तसेच बातम्यांचा इच्छुक उमेदवारांनी चांगलाच धसका घेतला आहे.