बेंगळुरू – प्रो-कबड्डी लीग स्पर्धेत साखळी लढतीत गुरुवारी झालेल्या लढतीत यू मुंबा संघाने पिंक पॅंथर्स संघाचा 37-28 अशा गुण फरकाने पराभव केला. या विजयासह यू मुंबा संघाने यंदाच्या स्पर्धेत बाद फेरीकडे आश्वासक वाटचाल केली आहे.
या सामन्यात यू मुंबाच्या अजित कुमार व अभिषेक सिंग यांनी अनुक्रमे 11 व 10 रेड गुणांची कमाई केली. पिंक पॅंथर्सचा स्टार खेळाडू अर्जुन देशवालने 9 रेड व 5 बोनस असे एकूण 14 गुण मिळवून दिले मात्र, त्याला अन्य खेळाडूंची पुरेशी साथ न मिळाल्याने त्यांच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
या स्पर्धेतील यापूर्वीच्या लढतीत यूपी योद्धा आणि गुजरात जायएंट्स यांच्यात रोमहर्षक खेळ झाला. मात्र, हा सामना अखेर 32-32 असा बरोबरीत सुटला. यंदाच्या मोसमात बरोबरीत सुटलेला हा तिसरा सामना आहे. या दोन्ही संघातील लढतीत प्रदीप नरवालने अफलातून खेळ करून आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्याने 11 गुण मिळवत त्याने सुपर 10 ला गवसणी घातली.
स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक 1200 गुण त्याच्या नावे जमा झाले असून त्याने आतापर्यंत 61 वेळा सुपर 10 नोंदवण्याचा विक्रमही केला आहे. या लढतीत पहिल्या हाफमध्ये गुजरातच्या संघाने 20-14 अशी आघाडी घेतली होती. सुरुवातीला यूपी योद्धाचा संघ भरात नसल्याचे जाणवत होते. मात्र, त्यानंतर यूपी योद्धाने राकेशला सुपरटॅकलमध्ये बाद केले. लढतीच्या 9 व्या मिनिटाला गुजरातने यूपी योद्धा संघाचे सर्व गडी बाद केले. मात्र, त्यानंतरही हा सामना 32-32 असा बरोबरीत सुटला.