उत्पादक कंपन्या उभारणार : पालिका देणार जागा
प्रकल्प सुरू झाल्यानंतर दूध पिशव्यांची समस्या संपणार
पुणे – शहरात विक्री होणाऱ्या दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्या नवीन पर्यावरण नियमांनुसार, संबंधित दूध व्यावसायिकांना ग्राहकांकडून खरेदी करणे बंधनकारक आहे. मात्र, कंपन्यांना याबाबत अडचणी येत असल्याने दूध उत्पादक तसेच विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून महापालिकेस या दुधाच्या पिशव्यांवर प्रक्रिया करणारा सुमारे 5 टन क्षमतेचा प्रकल्प उभारून दिला जाणार आहे. त्यासाठी पालिकेकडून जागा दिली जाणार असून प्रकल्प तसेच इतर सर्व खर्च या कंपन्यांकडून करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.
शहरात दूध पुरवठा करणाऱ्या मुख्य 16 कंपन्या आहेत. त्यांच्या माध्यमातून दरदिवशी सुमारे 3 लाख पिशव्यांद्वारे शहरात दूध वितरण केले जाते. तर, या पिशव्यांचे वजन तब्बल 7 ते 8 टन आहे. राज्य शासनाने नवीन पर्यावरण नियमांमध्ये शहरात विघटन न होणाऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांना बंदी घातली आहे. त्याच वेळी दूध विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी या पिशव्या ग्राहकांकडून परत घेण्याचे बंधन घातले आहे. मात्र, उत्पादकांना त्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
परिणामी दूध उत्पादकांकडून महापालिकेने त्याबाबत उपाययोजना करण्याची विनंती केली होती, त्यानुसार, महापालिके या कंपन्यांनी 5 टन प्लॅस्टिक पिशव्यांवर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारावा त्यासाठी महापालिका जागा देईल, असा प्रस्ताव दिला होता. त्यास या कंपन्यांनी सहमती दर्शविली असल्याचे मोळक यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लवकरच हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर दूध पिशव्यांची समस्याही संपणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.