राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून गडचिरोली नक्षलवादी हल्ल्याचा निषेध

आज महाराष्ट्र दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणल्याने महाराष्ट्रासह देशभरामध्ये दुःखाची लाट पसरली आहे. नक्षलवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे भ्याड हल्ला केला असून या हल्ल्यात 15 जवानांसह या ताफ्याचे चालक देखील शहीद झाले आहेत.

दरम्यान, या भ्याड नक्षलवादी हल्ल्याचा समाजातील सर्वच स्तरांमधून तीव्र निषेध केला जात आहे. राजकीय नेतेमंडळींनी देखील गडचिरोली येथील भ्याड नक्षलवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला असून शाहिद जवानांच्या कुटुंबीयांप्रती सहानभूती व्यक्त केली आहे.

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरद्वारे, “महाराष्ट्रातील गडचिरोली येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचा तीव्र निषेध. या नक्षलवादी हल्ल्यामध्ये मारल्या गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना. या हल्ल्यामध्ये जखमी झालेले पोलीस कर्मचारी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. हिंसाविरोधी लढ्यात संपूर्ण राष्ट्र एकत्र आहे.” असा संदेश दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गडचिरोली येथील नक्षलवादी हल्ल्याबाबत दुःख व्यक्त केलं असून हा हल्ला घडवणाऱ्यांना सोडलं जाणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. ते लिहितात, “महाराष्ट्रातील गडचिरोली येथे आमच्या सुरक्षा कर्मचा-यांवरील घृणास्पद हल्ल्याचा मी जोरदार निषेध करतो. मी सर्व शूर सैनिकांना सलाम करतो. त्यांचे बलिदान कधीच विसरले जाणार नाही. शोकग्रस्त कुटुंबांबरोबर माझे विचार आहेत. अशा हिंसाचाराच्या गुन्हेगारांना माफ केलं जाणार नाही.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला असून त्यांनी सदर नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला असल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. या हल्ल्यानंतर केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारला हवी असलेली सर्व मुदत पुरविण्यासाठी तत्पर असल्याचे देखील त्यांनी ट्विटरद्वारे सांगितले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.