जेरुसलेम – इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेली शांतता चर्चेमध्ये प्रगती होते आहे. मात्र अद्यापही या चर्चेतून कोणताही ठोस करार होऊ शकलेला नाही. या चर्चेदरम्यान अनेक मुद्यांवर अजूनही एकमत होऊ शकलेले नाही. जर या मुद्यांवर एकमत होऊ शकले नाही, तर प्रगतीपथावर असलेली ही चर्चा फिसकटू देखील शकते, असे अधिकाऱ्यांनी आज सांगितले.
हमासने ओलिस ठेवलेल्या इस्रायलींची सुटका आणि इस्रायलच्या तुरुंगातील पॅलेस्टिनींची सुटका या तडजोडीच्या मुद्यावर इस्रायल आणि हमासमध्ये अप्रत्यक्ष चर्चा सुरू आहे. या चर्चेमध्ये अमेरिका, कतार आणि इजिप्तकडून मध्यस्थी केली जाते आहे.
मात्र या आदलाबदलीच्यावेळी लागू होणारी युद्धबंदी कायमस्वरुपी असेल का आणि इस्रायलच्या सैन्याची माघार यासारख्या मुद्यांवरून अजून दोन्ही बाजूंमध्ये एकमत होऊ शकलेले नाही.
मात्र चर्चा प्रगतीपथावर असून अजून एकमत झालेले नाही. मात्र आता युद्ध समाप्तीच्या दृष्टीने आगामी काही दिवस महत्वाचे असतील, असे तीन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
२०२३ च्या ७ ऑक्टोबरला हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर गाझा पट्ट्यामध्ये युद्ध सुरू झाले. त्याला आता १५ महिने उलटले आहेत. हमासच्या हल्ल्यामध्ये १,२०० इस्रायली मारले गेले होते. आणि २५० जणांचे अपहरण करण्यात आले होते.
अपहरण केलेल्यांपैकी १०० इस्रायली नागरिक अजूनही हमासच्या तावडीत आहेत. मात्र ते आता जिवंत असण्याची शक्यता धूसर आहे. तर दुसरीकडे इस्रायलने गाझा पट्ट्यामध्ये केलेल्या कारवाईत ४६ हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.