किलोला 200 रुपये बाजारभाव : फेब्रुवारी ते मे दिवसाला 80 किलो उत्पादन
दीपक येडवे
वीसगाव खोरे – वेळू (ता. भोर) येथील प्रगतशील शेतकरी योगेश मधुकर पांगारे यांनी नोकरी सांभाळत अंजीराची फळबाग लागवड यशस्वी केली आहे. रासायनिक खते, औषंधाचा अल्प वापर आणि सेंद्रिय व जिवाणू खताचा वापर करून नैसर्गिक पध्दतीने अंजीर या नगदी पिकाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. त्यांनी 30 आर क्षेत्राची निवड केली. या परिसरातील उष्ण व कोरडे हवामान अंजिराला उपयुक्त असल्याने काळ्या, ताबुंस जमिनीत लागवड करणे सोपे झाले.
2014 मध्ये पुणेरी या जातीची 100 रोपे लावली. मशागतीनंतर चांगली माती, पोयटा, शेणखत एक घमेले, रासायनिक खत सिंगल सुपर फॉस्पेट अर्धा किलो प्रतिखड्डा व थायमेट वापरून पावसाळ्यापूर्वी खड्डे भरून घेतले. दोन ओळीत 10 फूूट आणि दोन रोपांत 10 फुटांचे अंतरावर लागवड केली. पाण्याचे व्यवस्थापन ठिबकद्वारे केले. हिवाळ्यात दर आठवड्याला पाणी दिले, उन्हाळ्यात दर तीन दिवसाला पाणी दिले आणि उष्णता वाढल्याने रोज सकाळी एक तास ठिबकने पाणी दिले. जीवामृतामुळे फळांची वाढ चांगली होते, गोडी वाढते तसेच रोगांना बळी पडत नाहीत.
फळांची संख्या वाढते आहे. या फळांना एक किलोला 200 रुपये दर मिळतो, फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत प्रति दिवसाला सरासरी 80 किलोप्रमाणे उत्पादन होते. झाडांची उंची वाढल्याने फळ काढण्यासाठी तसेच रोगाचा प्रादुर्भाव झाडावर झाल्यास फवारणी करणे अडचणी ठरते त्याकरता दर तीन वर्षानंतर झाडांची छाटणी केली, त्यामुळे फांद्यांची संख्या वाढून फळे वाढण्यास मदत होते. पहिले तीन वर्ष झाडांना अर्धा घमेले शेणखत दर सहा महिन्यातून एकदा दिले, तीन वर्षानंतर एक घमेले शेणखत सहा महिन्यांत दिले. कीडनियंत्रणासाठी वेळोवेळी औषध फवारणी करताना जैविक कीड नियंत्रण औषधांचा वापर केला, जेणेकरून येणारे फळ वजनदार रसाळ होण्यास मदत होते.
सेंद्रियचा 15 दिवसांनी वापर
लागवडीनंतर दर 15 दिवसांनी जिवामृत(200 लिटर पाण्यात 10 किलो शेण, गोमूत्र 10 लिटर, गूळ 3 किलो, बेसन पीठ 2 किलो, कडूलिंबाचा पाला 10 किलो यांचे मिश्रण आठ दिवस ठेवल्यानंतर गाळून घेऊन पाण्यावाटे देण्यात येते. अमृतपाणी, गायीच्या शेणापासून तयार झालेले जिवाणू संवर्धन आदी सेंद्रिय खतांचा वापर करण्यात आला.
तांबेराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी
तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एम 45 आणि 100 लिटर पाण्यात 200 ग्रॅम ब्लायटॉक्स 50 टक्के घालून दर पंधरा दिवसांनी फवारणी करत आहे. दव पडत असेल तर सकाळी पहाटे गाईच्या शेणाच्या गौरीचा धूप केल्याने तांबेरा रोगावर नियंत्रण ठेवता येते.
अंजीर फळाविषयी पुणे शहरातील नामांकित सोसायटीत सेमिनार आयोजित केले जातात. यात प्रशिक्षक म्हणून अंजीर लागवड आणि उच्च प्रतीचे अंजीर कसे ओळखावे याची माहिती देतो, त्यामुळे स्वतःचा ग्राहकवर्ग तयार झाल्याने उच्च प्रतीचे अंजीर थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहे.
– योगेश पांगारे, प्रगतशील युवा शेतकरी, वेळू (ता. भोर)