लस उत्पादक मालामाल, सीरमचा नफा तब्बल “इतक्‍या’ टक्‍क्‍यांनी वाढला

मुंबई : स्टिलपासून ऑटोमोबाईलपर्यंत, आणि फर्निचरपासून ते रिअल इस्टेटपर्यंत, साऱ्या धंद्यात सध्या करोनाच्या महामारीमुळे मंदी आहे. दूध आणि जीवनावश्‍यक उत्पादने सोडल्यास एकाही व्यवसायाला बरे दिवस नाहीत.

मात्र औषधांच्या व्यवसायानं आजवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढलेत. त्यात सर्वात आघाडीवर आहे, ते म्हणजे पुण्यातलं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. सीरम इन्स्टिट्यूटनं लसीच्या उत्पादन आणि विक्रीद्वारे किती कमाई केली, याची आकडेवारी कॅपटिलाईनचा दाखला देऊन बिजनेस टूडेनं प्रसिद्ध केली आहे.

वर्ष 2019-20 या आर्थिक वर्षात सीरमला एकूण उत्पन्न 5 हजार 926 कोटी मिळालं. यातला निव्वळ नफा हा तब्बल 2 हजार 251 कोटी रुपये इतका होता. म्हणजे एकूण उत्पन्नात नफ्याचं प्रमाण होतं थेट 41.3 टक्के इतकं होतं. गेल्या वर्षात औषध निर्मितीतल्या 418 कंपन्यांनी 5 हजार कोटींहून जास्त उत्पन्नांची घोषणा केली होती. मात्र यात सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी सुद्धा सीरमच ठरली आहे.

एका आकडेवारीत मागच्या काही वर्षात सीरमचा नफा कसा वाढला, याचाही दाखला दिला गेलाय. 2013 मध्ये सीरमचा नफा हा 1741 कोटी इतका होता. 2016 मध्ये त्यात वाढ होऊन तो 2057 कोटी इतका झाला आणि 2019-20 सालात तोच नफा 2251 कोटींवर गेला. पहिल्या लाटेनंतर कोरोना लसीबाबत लोकांच्या मनात धाकधूक होती.

मात्र दुसऱ्या लाटेनंतर चित्र बदललं. लस घेऊनही कोरोना होत असला, तरी लसीमुळे कोरोनाचा त्रास कैक पटीनं कमी होतोय, हे लक्षात आल्यानंतर लोकांनी लसीसाठी रांगा लावल्या. म्हणूनच सीरमनंही आता लसीच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केलंय.

सीरमच्या लसीचा केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांमध्ये पुरवठा होतोय. केंद्राला 200 रुपये प्रमाणे सीरमची लस मिळतेय. राज्य सरकारला 300 रुपये तर खासगी दवाखान्यांना 600 रुपये प्रमाणे एक डोस दिला जातोय. त्यामुळे जर भविष्यात सीरमनं 50 कोटी डोस विकले, तर सीरम शब्दशः मालामाल होणार आहे.

जर 300 रुपये प्रमाणे जर सीरमनं 50 कोटी डोसची विक्री केली, तर त्यातून सीरम कंपनीला तब्बल 15 हजार कोटींचं उत्पन्न होणार आहे. कोव्हिशिल्ड लसीची मागणी पाहता सीरमचे अध्यक्ष आदर पुनावालांनी 2.5 अब्ज डोसचं टार्गेट ठेवलंय. मात्र ते उत्पादनही कमी पडलं, तर सीरम वर्षाला 3 अब्ज डोसची सुद्धा निर्मिती करु शकते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.