औरंगाबाद : महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राध्यापकाची राहत्या घरात हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना औरंगाबाद शहरातील सिडको एन 2 भागात घडली आहे. प्राध्यपकाच्या खूनामध्ये शहरात एकच खळबळ उडाली आहे.
डॉ. राजन हरिभाऊ शिंदे असे खून करण्यात आलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. डॉ. शिंदे हे शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयात इंग्रजी विषय शिकवतात. त्यांची हत्या नेमकी कोणत्या कारणाने करण्यात आली हे अद्याप समोर आले नाही.
खूनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थली धाव घेतली आहे. मारेकऱ्यांनी मृत प्राध्यापकाचा गळा चिरून त्यांच्या हाताच्या नसा कापल्या आहेत. रात्रभर झालेल्या रक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.