नगर – शहरातील स्टेशन रोडवरील माणिकनगर वसाहतीत चोरांच्या हल्लयात एका महाविद्यालयातील प्राध्यापक जखमी झाले आहे. तीन चोरांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, शहर पोलीस या हल्ल्याच्या माहितीपासून अनभिज्ञ आहे.
शहरासह उपनगरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. सावेडी, बुरूडगाव रोड, केडगाव भागातील उच्चभ्रू वसाहती चोरांनी टार्गेट गेल्या आहेत. त्यानुसार स्टेशन रोडवरील माणिकनगर या उच्चभ्रू वसाहतीत शनिवारी पहाटे चोरांनी धुमाकूळ घातला. वसाहतीमध्ये चोर घुसत असताना तेथील रखवालदाराने त्यांना हटकले.
ते तिघे होते. रखवालदार विचारपूस करत असतानाच या चोरांनी त्याच्याबरोबर धिंगाणा घालण्यास सुरूवात केली. हा सर्व प्रकार वसाहतीमधील यांच्या घरासमोर सुरू होता. हा गोंधळ त्यांनी ऐकला. त्यावेळी ते बाहेर आले. रखवालदाराबरोबर हे चोर हुज्जत घालत असतानाच ते चोरांच्या मागे पळाले.
तिघा चोरांपैकी एकाला पकडण्यात प्रा. काळे यांना यश आले.
परंतु या दोघांमध्ये चांगलीच धरपकड झाली. त्यात चोरांनी त्यांना धक्का दिला आणि पळ काढला. त्यावेळी चोरांच्या मागे प्रा. काळे पळाले. त्यावेळी चोरांनी गुंगारा दिल्याने ते रस्त्यावर पडले. त्यात ते जखमी झाले. त्यांच्या दोन्ही हाताला मोठी जखम झाली आहे. या गोंधळामुळे वसाहतीमधील इतर लोक उठले. तोपर्यंत चोरांनी तेथून धूम ठोकली होती. यानंतर लोक पहाटेपर्यंत वसाहतीत जागेच होते. प्रा. काळे यांनी प्राथमिक उपचार घेतले आहेत. मात्र याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.