सातारा – राज्यातील राजकारण दिसवसेंदिवस ढवळून निघाले असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस यांनी पश्चिम महाराष्ट्रात पक्ष बळकटीसाठी दौरा सुरू केला आहे. याच दौऱ्याचा भाग म्हणून तेजस ठाकरे यांनी शिवसेनेचे उपनेते व सातारा-सांगलीचे संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांची साताऱ्यानजिक राष्ट्रीय महामार्गावरील एक हॉटेलमध्ये भेट घेतली. या भेटीदरम्यान ठाकरे व बानुगडे यांच्यात महत्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबरोबर आता तेजस ठाकरेही शिवसेना बळकटीकरणासाठी बाहेर पडल्याने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. शिवसेनेचे नेते व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपसोबत हातमिळवणी केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. त्यानंतर शिंदे यांनी थेट शिवसेनेवरच त्यांच्या गटाचा अधिकार सांगून धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाचे दार ठोठावले. त्यामुळे मुळची शिवसेना व शिंदे गट यांच्यातील संघर्षाला तीव्रता आली. अशा परिस्थितीत शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खा. संजय राऊत माध्यमांना सामोरे जाऊन
शिंदे गट व भाजपवर तुटून पडत आहेत. तर दुसरीकडे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभर दौरा करण्याचे जाहीर करून त्याला सुरूवात केली आहे. या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे भाजप व शिंदे गटाचा खरपूस समाचार घेताना दिसले. या सगळ्या घडामोडीदरम्यान उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस कुठेही समोर आलेले नव्हते.
मात्र, शुक्रवारी त्यांनी कोल्हापूरचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी साताऱ्यानजिक महामार्गावरील एका हॉटेलमध्ये प्रा. नितीन बानुगडे- पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान ठाकरे व बानुगडे यांच्यात पक्षबांधणीबाबत चर्चा झाली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, सेनेकडून लोकसभा लढवलेले पुरूषोत्तम जाधव यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर ठाकरे व बानुगडे यांच्या या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.
केवळ औपचारिक भेट
या भेटीबाबत शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “तेजस ठाकरे कोल्हापूरला निघाले होते. जाता जाता महामार्गावर त्यांची भेट घेतली असून यादरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.”