नवी दिल्ली – पहिल्या तिमाहीत भारताचा विकासदर अपेक्षेपेक्षा कमी म्हणजे केवळ 5.4% इतका नोंदला गेला आहे. अशा परिस्थितीत अस्वस्थता पसरली आहे. मात्र आर्थिक व्यवहार सचिव अजय शेठ यांनी सांगितले की, पहिल्या आणि दुसर्या तिमाहीत विकासदर कमी झाला असला तरी पुढील सहा महिन्यात हा विकासदर वाढणार असल्याची चिन्हे स्पष्ट दिसून येत आहेत.
आर्थिक सर्वेक्षणात सरकारने विकासदर 6.5 ते 7% राहील असे म्हटले आहे. गेल्या वर्षाचा विकासदर 8.2% होता. पहिल्या तिमाहित विकासदर बर्यापैकी म्हणजे 6.7 टक्के होता. दुसर्या तिमाहीत मॅन्युफॅक्चरिंग आणि खान क्षेत्राची उत्पादकता कोसळल्यामुळे विकासदर दोन वर्षाच्या निचांकी पातळीवर गेला आहे.
दरम्यान गेल्या दहा वर्षात भारताने आर्थिक सुधारणा जारी ठेवल्या आहेत. पायाभूत सुविधा वाढविल्या आहेत. त्यामुळे दुसर्या सहा महिन्यात विकासदर वाढेल आणि एकूण वर्षाचा विकासदर 6.5% पेक्षा कमी होणार नाही, या मताचा अर्थ मंत्रालयाचे मुख्य सल्लागार व्ही अनंत नागेश्वरांन यांनी पुनरुचार केला आहे.
ते म्हणाले की, पहिल्या तिमाहीत निवडणूकामुळे केंद्र सरकारकडून खर्च कमी झाला होता. आता केंद्र सरकार ही तूट पुढच्या सहा महिन्यात भरून काढण्याची शक्यता आहे. चांगला पाऊस पडल्यामुळे खरीपाबरोबरच रब्बीचे उत्पादन वाढणार आहे. त्याचबरोबर सेवा क्षेत्राची उत्पादकता मंदावलेली नाही. अशा परिस्थितीत पुढील दोन तिमाहीमध्ये भारताचा विकास दर वाढेल आणि एकूण वर्षाचा विकासदर समाधानकारक राहील असे आपल्याला ठामपणे वाटते, असे ते म्हणाले.