बॅकपॅक आणि ट्रॉली अशा दोन स्वरूपात हे यंत्र उपलब्ध
पुणे – संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) सेंटर फॉर फायर एक्सपलोझिव्ह ऍन्ड एन्व्हारयमेंट सेफ्टीच्या वतीने सार्वजनिक जागेच्या निर्जंतुकीकरणासाठी स्वदेशी बनावटीच्या सॅनिटायझर सिलिंडरची निर्मिती केली आहे. बॅकपॅक आणि ट्रॉली अशा दोन स्वरुपात हे यंत्र उपलब्ध असून, लवकरच औद्योगिक सहकार्याच्या माध्यमातून या यंत्राची निर्मितीकरून ती आरोग्य आणि सफाई यंत्रणांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.
करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशात अनेक ठिकाणी परिसराचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. मात्र, यामध्ये प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. निर्जंतुकीकरण प्रक्रिया सुलभ पद्धतीने आणि कमी मनुष्यबळाचा उपयोग करून अधिकाधिक परिसरात फवारणी करता यावी, यासाठी स्वदेशी बनावटीच्या सॅनिटायझर सिलिंडरची निर्मिती केली आहे. या सॅनिटायझर सिलिंडरच्या माध्यमातून पाणीमिश्रित “हायपोक्लोराईड’ची फवारणी केली जाते. आकाराने लहान आणि वाहून नेण्यास सोप्या असलेल्या बॅकपॅक सिलिंडरच्या माध्यमातून सुमारे 300 मीटरपर्यंतचा परिसर निर्जंतुकीकरण करता येते तर, मोठ्या आकाराच्या ट्रॉली सिलिंडरच्या माध्यमातून तब्बल 3 हजार मीटर परिसरात निर्जंतुकीकरण करता येते.
या सिलिंडरची द्राव्य क्षमता 50 लीटर असून सुमारे 12 ते 15 मीटर अंतरापर्यंत फवारणी करता येते. रुग्नालये, व्यावसायिक कार्यालये, संस्था अशा छोट्या स्वरुपातील परिसरापासून सार्वजनिक बस स्थानक, रेल्वे स्थानक, मॉल्स, विमानतळ अशा विविध ठिकाणी या यंत्राचा वापर करून प्रभावीपणे निर्जंतुकीकरण केले जाऊ शकते असा दावा, डीआरडीओने केला आहे.