जॉन अब्राहमने गेल्या काही वर्षांपासून निर्मितीमध्ये अधिक लक्ष घालायला सुरुवात केली आहे. जॉन अब्राहम एन्टरटेनमेंट याच कंपनीच्या नावाने त्याने यापूर्वी काही मसाला फिल्म्सची निर्मिती केली आहे. आता तो सामाजिक उद्योजिका रेवती रॉय यांच्या बायोपिकची निर्मिती करणार आहे.
या सिनेमासाठी रॉबी ग्रेवाल आणि अनिल बोहरा यांच्या सहकार्याने तो हा प्रोजेक्ट करणार आहे. रेवती रॉय आणि अन्य काही जणांबरोबरचा एक फोटो जॉनने ट्विटरवर पोस्ट केला आणि या बायोपिकची घोषणा केली. रेवती रॉय यांनी आपल्या उद्योगांच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण केले, त्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत. रेवती रॉय या “हे दिदी’ या हायपरलोक लॉजिस्टीक व्हेंचरच्या संस्थापिका आहेत.
दुचाकीवरून घरपोच पार्सलची डिलिव्हरी पोहोचवणाऱ्या महिलांची टीम त्यांच्या या संस्थेमध्ये कार्यरत असते. या संस्थेच्या माध्यमातून भेटवस्तू, घरगुती वापराच्या वस्तू, किराणा सामान, फुले आणि अन्य अनेक वस्तूंची घरपोच डिलिव्हरी दिली जात असते. रॉय यांनी केवळ महिलांद्वारे चालवली जाणारी आशियातील पहिली टॅक्सी सेवाही सुरू केली आहे. भारत सरकारच्या “अटल इनोव्हेशन मिशन’मध्येही त्यांचा सहभाग आहे.