200 ते 320 रु. गेल्या आठवड्यातील शेवग्याचे भाव
पुणे – नवीन हंगाम सुरू झाल्याने मार्केटयार्डातील तरकारी विभागात शेवग्याची आवक वाढली आहे. परिणामी, गेल्या महिनाभरापासून शेवग्याचे वाढलेल्या भावात रविवारी निम्म्याने घसरण झाली. घाऊक बाजारात शेवग्याच्या किलोला 100 ते 130 भाव मिळाला. तर किरकोळ बाजारात शेवग्याचे भाव 140 ते 160 रुपयांपर्यंत खाली आले आहेत.
महिनाभरापुर्वी अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेवग्याचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परिणामी, शेवग्याची आवक घटून तुटवडा निर्माण झाला होता. बाजारात दाखल होत मालाच्या तुलनेत मागणी मोठी असल्याने घाऊक बाजारात एक किलो शेवग्याची 220 रुपये, तर किरकोळ बाजारात 200 ते 320 रुपयांना विक्री होत होती. दरम्यान, रविवारपासून नवीन हंगामातील शेवगा बाजारात येण्यास सुरुवात झाली. मागणीच्या तुलनेत आवक मोठी असल्याने भावात घट झाली. बाजारात प्रति दहा किलो शेवग्याला 1000 ते 1300 रुपये भाव मिळाला गेल्या आठवड्यात हा भाव 2,400 रूपयांपर्यंत होता.
मार्केटयार्डात पुणे विभागासह तामिळनाडू, गुजरात येथून शेवगा दाखल होत असल्याचे सांगून आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल घुले म्हणाले, “लांबलेल्या पावसामुळे शेवग्याचा मोहोर गेल्याने शेवटच्या टप्प्यातील उत्पादन वाया गेले. त्यामुळे पुणे विभागातून आवक ठप्प झाली होती. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून बाजारात आवक कमी आणि मागणी जास्त असे चित्र असल्याने भाव तेजीत होते. दरम्यान, पुणे विभागातूनही आवक होऊ लागल्याने शेवग्याचे वाढलेले भाव पूर्वपदावर येऊ लागले आहेत. शेवगा हा उष्ण असल्याने त्यास उन्हाळ्यात कमी मागणी असते. त्या तुलनेत थंडीमध्ये जास्त मागणी असते. त्यामुळे या काळात शेवग्याला चांगले भाव मिळतात. सध्या हंगाम सुरू झाला आहे.