जमशेदपूरमध्ये टाटा मोटर्समध्ये उत्पादन निम्म्यावर

आठवड्यात तीनच दिवस उत्पादन, चार दिवस सुट्ट

अवलंबित 12 कंपन्या बंद, 30 बंद होण्याच्या मार्गावर

जमशेदपूर- वाहन उद्योगामध्ये सध्या आलेल्या जागतिक मंदीचा फटका, जमशेदपूर येथील टाटा मोटर्स या सर्वात मोठ्या वाहन उत्पादक कंपनीला बसला असून, कंपनीतील वाहन उत्पादन निम्म्याने घटवण्यात आले आहे. रविवारची सुट्टी आणि गुरुवार ते शनिवार कंपनीतील कामगारांना सुट्टी देण्यात आली असल्याने, सध्या या कंपनीत फक्त सोमवार ते बुधवार असे काम होत आहे. याचा परिणाम म्हणून टाटा मोटर्सला सुटे भाग पुरवणाऱ्या अथवा अभियांत्रिकी सेवा देणाऱ्या 12 लघु उद्योग कंपन्या बंद (ऍन्सिलरी) झाल्या असून, स्टील सेक्‍टरमधील आणखी 30 कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे समजते. जमशेदपूरच्या आदित्यपूर औद्योगिक वसाहतीतले हे चित्र काळजी निर्माण करणारे आहे.

दर महिन्याच्या 26 कामाच्या दिवसांपैकी 12 दिवस सुमारे एक हजार कामगारांना कामगारांना घरीच थांबण्याच्या सूचना टाटा मोटर्सने दिल्या असल्याने, सध्या महिन्याभरात 14 दिवसांचेच काम होत आहे. यालाच “ब्लॉक क्‍लोजर’ असे म्हणतात. त्यामुळे अर्थातच वाहनांचे उत्पादन घटले आहे. वाहनांचे उत्पादन घटल्याने त्याचा परिणाम अन्य लघु उद्योजकांवर होत असल्याने, चिंतेचे वातावरण पसरले आहे.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन महिन्यांत कंपनीमध्ये 15 दिवस पुरेल इतकेच काम होते. तर सध्या सुरु असलेल्या ऑगस्ट महिन्यात, केवळ आठच दिवस कंपनी सुरु राहील, इतकेच काम टाटा मोटर्सकडे असल्याने, कामगारांच्या आणि ऍन्सिलरी कंपन्यांच्या अस्तित्त्वाचा प्रश्‍न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

दुसरीकडे, राज्य सरकारने औद्योगिक क्षेत्रासाठीचे वीज दर वाढवलेले असून, लोखंड वितळवण्यासाठीच्या भट्‌टया (फर्नेसेस) ज्या कंपन्यांना अनिवार्य आहेत, अशा स्टील कंपन्यांचे त्यामुळे धाबे दणाणलेले आहे. आधी असलेला रु. 3.50 पैसे प्रतीयुनिटचा दर आता 38 टक्के दरवाढीनंतर थेट रु.5.50 पैसे इतका झाला आहे. त्यामुळे दरमहा वीजेचे बील भरण्यासाठी मोठी आर्थिक तजवीज करावी लागणार आहे. अशातच कामगारांना काम कमी झाल्याने, घरी बसून वेतन द्यावे लागणार आहे.

“वाहन उद्योगात येणारी मंदी काही नवीन नाही. सहसा पावसाळ्याच्या दिवसांत नव्या वाहनांची मागणी कमी होत असते. शिवाय पूर्वीपेक्षा आता स्पर्धाही वाढलेली आहे. अशा प्रकारच्या मंदीतून वाहन उद्योग अनेकदा सावरलाही आहे. त्यामुळे या मंदीने कोणीही गांगरुन जाण्याचे कारण नाही. भारतात सणासुदीचे दिवस सुरु होताच, पुन्हा एकदा हा उद्योग भरारी घेईल, आणि सध्या होत असलेल्या नुकसानीची भरपाई कंपन्या जरुर करतील.
– इंदर आगरवाल, अध्यक्ष आदित्यपूर लघु उद्योजक संघटना

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.