सुवर्ण मंदिरात खलीस्तान समर्थनार्थ घोषणाबाजी

अमृतसर : ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या 36 व्या वर्षपूर्तीनिमित्त शिख कट्टरतावाद्यांनी खलीस्तान समर्थनाच्या घोषणा सुवर्ण मंदिराच्या आवारात दिल्याने खळबळ उडाली आहे. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि माजी खासदार सिमरनजितसिंग मान यांचा मुलगा इमानसिंग यांच्या नेतृत्वाखालील 100 जणांच्या गटाने अकाल तख्त जवळ ही घोषणाबाजी केली.

अकाल तख्तचे समांतर जथ्थेदार धिआनसिंग मांड यांनी मान यांच्या समवेतच्या समुहाबरोबर आवारात प्रवेश केला. त्यांनी या जमावाला मार्गदर्शन केले. सुवर्ण मंदिराचा ताबा घेतलेल्या शस्त्रसज्ज अतिरेक्‍यांना हुसकावण्यासाठी ऑपरेशन ब्ल्यू स्टार 1984 मध्ये करण्यात आले होते. या कारवाईत मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार दमदमी टाकसाल, अकालतख्त जथ्थेदार ग्यानी हरप्रितसिंग आणि शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीच्या सदस्यांनी केला. अकालतख्तने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या कारवाईने झालेल्या जखमा शीख समाज कधीही विसणार नाही, असे ग्यानी हरप्रितसिंग यांनी सांगितले. यावेळी सुवर्ण मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारांवर पोलिसांनी बॅरीकेटिंग केले होते. तेथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मंदिरात करोना साथीमुळे एक हजार जणांनाच प्रवेश देण्यात आला. अन्यथा या दिवशी दरवर्षी सुमारे लाखभर भाविक या पवित्र स्थळाला भेट देतात.

Leave A Reply

Your email address will not be published.