राडारोड्यावर प्रक्रियेचा प्रकल्प सुरू होण्याआधीच बंद होण्याच्या मार्गावर
पुणे – राडारोड्यावर प्रक्रियेसाठी महापालिकेने वाघोली येथील खाणीमध्ये प्रकल्प उभारण्यात आला आहे. दरररोज सुमारे 200 टन राडारोड्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाबाबत शहरातील बांधकाम व्यावसायिक आणि क्षेत्रीय कार्यालयेही उदासिन असल्याचे समोर आले आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेने निवेदन देऊनही अजून एकाही व्यावसायिक, संस्था अथवा शासकीय कार्यालयाने नोंदणी केलेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प नावरपुरताच सुरू असल्याचे चित्र आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकरण आणि दररोज नव्याने बांधकामे होत आहेत. तर शासकीय यंत्रणांचीही विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे या कामांमधून निघणारा राडारोडा अंधाराचा फायदा घेत डोंगर, नाले, तसेच नदीकाठ परिसरात टाकला जात आहे.
या राडारोड्याचा वापर करूनच नाले, नद्यांवर अतिक्रमणही केले जात आहे. राडारोडा टाकणाऱ्यांकडून पालिका 25 हजारांचा दंड वसूल करते. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक तसेच शासकीय यंत्रणांनी या राडारोड्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने वाघोली येथे जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या जागेत प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. त्याच्या वापरासाठी पालिकेकडे नोंदणीचे बंधन घालण्यात आले आहे. पण, पालिकेने दोन महिन्यांपूर्वी त्याचे जाहीर प्रकटन देऊनही घनकचरा विभागाकडे एकानेही नोंदणी केली नसल्याचे समोर आले आहे.
बांधकाम प्रकल्पांना मंजुरी देताना अथवा विविध प्रकल्प विभागांना खोदाईची परवानगी देतानाच राडारोड्यावरील प्रक्रियेसाठी ही नोंदणी करण्याचे बंधन घातले जाणे अपेक्षित आहे; पण त्याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे.