नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा येत्या 23 जुलैपासून सुरु होत आहे. या स्पर्धेतील पदकविजेत्यांचाही समावेश असावा यासाठी यंदा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली आहे.
महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त 29 ऑगस्टला प्रत्येक वर्षी राष्ट्रीय क्रीडादिनी राष्ट्रपतींच्या हस्ते देशातील सर्वोत्तम क्रीडापटूंना सन्मानित केले जाते. परंतु यंदा 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा होणार असल्याने ही प्रक्रिया विलंबाने राबवण्यात येणार आहे.
यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी आमच्याकडे नियोजित तारखेपर्यंत बरीच नामांकने सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे नामांकन प्रक्रिया संपलेली आहे. परंतु समितीच्या अखेरच्या बैठकीत आम्ही ऑलिम्पिक पदकविजेत्यांचा समावेश करण्याचे धोरण आखले आहे, अशी माहिती क्रीडा मंत्रालयाने दिली आहे.