अशी घ्या दातांची काळजी…

दात किडण्याचे मुख्य कारण?

लहानपणापासूनच काळजी घेतल्यास दात निरोगी व सुंदर राहतील. भारतात प्रत्येक दोन मुलांमध्ये दंतक्षयाचे प्रमाण सुमारे 70 टक्‍क्‍यांपर्यंत आहे.
दात किडण्याचे मुख्य कारण
1. आपल्या आहारात विविध पिष्टमय पदार्थ येतात
2. हे पदार्थ दातांच्या फटींमध्ये अडकून बसतात.
3. त्यावर आपल्या तोंडातील जंतूंची प्रक्रियाहोते
4. या प्रक्रियेतून विविध आम्ले तयार होतात.
5. या आम्लांचा दातांच्या पृष्ठभागावर परिणाम होतो
6. त्यामुळे त्या भागातील कॅल्शियम विरघळते
7. अशा कॅल्शियम विरघळलेल्या भागात एक खड्डा पडतो.
8. त्या खड्ड्यात परत अन्नकण अडकून बसतात
9. दात किडायची क्रिया ही कायम सुरू राहते.

दात पूर्णपणे किडल्यानंतर त्यांचे तुकडे पडायला लागतात व ही कीड दातांच्या आत शिरा व नसा असलेल्या मऊ भागापर्यंत (पल्प चेंबर) पोहोचते व त्यामुळे दातदुखी सुरू होऊन शेवटी गळू तयार होते व दात काढण्याची जरूर पडते. दातांची कीड थांबविण्यासाठी काळजी घेतल्यास दंतरोगापासून बचाव करता येईल.

1. लहान मुलांना बाटलीने दूध पाजण्याच्या वेळी बाटली फार काळ तोंडात ठेवू नये. त्यामुळे दूध तोंडात साठून राहते व दात किडण्यास मदत करते.
2. आहारात फार शिजलेले, मऊ, गोड, चिकट पदार्थ विशेष करून नसावे. गोळ्या, चॉकलेट हे पदार्थ म्हणजे दातांचा सर्वांत मोठा शत्रू. हल्ली मुलांना हे पदार्थ खाण्याची वाईट सवय लागली आहे.

3. मुलांना शेंगदाणे, सुकामेवा, काकडी, गाजर, सफरचंद, पेरू असले कच्चे व ज्यांना जास्त चर्वण करावे लागेल, असे पदार्थ दिल्यामुळे दात आपोआप स्वच्छ तर होतीलच पण दातांना योग्य व्यायाम मिळून ते निरोगी राहतील. अन्नकण अडकून बसल्यामुळे दात किडणार नाहीत.
4. दात स्वच्छ ठेवण्याचे दोन मार्ग म्हणजे गुळण्या करणे व दात ब्रशने स्वच्छ करणे. दात स्वच्छ करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ब्रश. आपण खाल्लेले पदार्थ चावून बारीक करतो. त्यामुळे ते दातांच्या फटीमध्ये अडकून बसतात. त्यामुळे दात किडतात व तोंडाला वाईट वास येतो. हे अन्नकण आपल्याला दात नुसत्या बोटाने घासून काढून टाकता येत नाहीत. पण ब्रशला असलेले बारीक केस दाताच्या फटीत अडकलेले अन्नकण काढून टाकतात व दात स्वच्छ राहतात.

5. प्रत्येक जेवणानंतर व झोपण्यापूर्वी व सकाळी उठल्यानंतर दात घासणे गरजेचे मानले जाते. ब्रशबरोबर टुथपेस्ट वापरलीच पाहिजे असे नाही. पण पेस्टमध्ये असलेल्या घटकांमुळे दातांवर तयार होणारा चिकट पदार्थ (प्लाक) निघण्यास मदत होते व पेस्टमध्ये असलेल्या सुवासामुळे तोंडाचा वास जाऊन प्रसन्न वाटते.
6. लहान मुलांना फ्लोराईडयक्‍त पेस्ट वापरणे फायदेशीर होते. या क्षारामुळे दातांच्या बाहेरील कवच (इनॅमल) कठीण होते व त्यावर आम्लांचा परिणाम न झाल्यामुळे दात किडण्याला आळा बसतो. दरवेळी खाल्ल्यानंतर खळखळून गुळण्या केल्यामुळे अडकून बसलेले अन्नकण निघतात.

7. वर्षांतून कमीत कमी दोन वेळा दंततज्ज्ञाकडे जाऊन दात तपासून घ्यावेत. दातांची कीड दातांच्या आतील भागापर्यंत (पल्प) पोहोचेपर्यंत दात किडलेले समजून येत नाहीत. वेळोवेळी डेंटिस्टला दात दाखवल्यास किडेचा प्रादुर्भाव झाला असल्यास लगेच समजून येईल व त्यावर लगेच उपचार केल्याने (दात भरून घेणे) जास्त दात किडण्याला आळा बसेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.