दहावी, बारावीच्या वर्गांबाबत स्पष्ट सूचना आल्यानंतरच कार्यवाही

महापालिका शाळांबाबतचा निर्णय कधी घेणार?

पुणे – राज्य शासनाचे स्पष्ट आदेश आल्यानंतरच महापालिका शाळांमधील इयत्ता दहावी आणि 12 वीचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभाग प्रशासनाने दिली आहे.

महापालिका माध्यमिक शिक्षण विभागाकडे यावर्षी सुमारे 12 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. त्यातील सुमारे सात हजार विद्यार्थीच ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. तर 5 ते 6 टक्के विद्यार्थी ग्रुपच्या माध्यमातून शिक्षण घेत असून उर्वरित जवळपास 25 ते 30 टक्के विद्यार्थ्यांनी अजूनही ऑनलाइन शिक्षणासाठी लॉग-इन केलेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना वर्गात येऊनच दहावी, 12 वीचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.
करोनामुळे सध्या राज्यभरातील शाळा, महाविद्यालये बंदच आहेत. त्यानंतर पुन्हा “न्यू नॉर्मल’ सुरू झाल्याने टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल होऊ लागले आहे. त्यानंतर राज्यात आता फक्त शाळा आणि मंदिरेच बंद आहेत.

दरम्यान, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतेच दहावी, बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे सुतोवाच केले असून त्याचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनेक शाळांकडून वर्ग सुरू होण्याच्या अंदाजाने अभ्यासक्रम तसेच शिक्षक आणि वर्गांचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. महापालिकेने मात्र शासन आदेश आल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्याची भूमिका घेतली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.