बारामती रेल्वे स्थानकातील समस्या सुटणार

विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा यांची पाहणीनंतर आश्‍वासन

बारामती- रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतल्यानंतर रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी आज तातडीने बारामती रेल्वे स्थानकाला भेट देत रेल्वे स्थानकात भेडसावणाऱ्या समस्या विषयी माहिती घेतली. येथील सर्व समस्या सोडवू असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.

बारामती रेल्वे स्थानकाबाबत सुळे यांनी विनोदकुमार यादव यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले होते. त्या अनुषंगाने रेणू शर्मा यांनी आज पुणे ते बारामती रेल्वेने प्रवास करीत प्रत्येक स्थानकावर थांबून तेथील अडचणींची माहिती घेतली. बारामतीतही त्यांनी स्थानकाची सविस्तर पाहणी करीत अनेक सूचना केल्या. आज, शर्मा यांच्यासमवेत परिचालन व्यवस्थापक गौरव झा, विद्युत अभियंता जे.पी. मिश्रा, विभागीय अभियंता विकास कुमार आदी उपस्थित होते. बारामतीचे उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, गटनेते सचिन सातव, समन्वयक प्रवीण शिंदे, नितीन सातव, नगरसेविका सविता जाधव आदींनी रेणू शर्मा यांचे स्वागत केले. रेल्वे स्थानक व्यवस्थापक प्रशांत पाटील यांनी शर्मा यांना सर्व माहिती दिली.

सचिन सातव, प्रवीण शिंदे आदींनी बारामतीच्या रेल्वे स्थानकावरील विविध समस्यांबाबत शर्मा यांना माहिती दिली. स्वच्छता व इतर पूरक बाबींसह काही नवीन बाबी करण्याचे निर्देश शर्मा यांनी जागेवरच दिले. नवीन शेडचे काम निकृष्ट झाल्याच्या तक्रारी या वेळी केल्या गेल्या. रेल्वे स्थानकाची इमारत जुनी झाली असून तेथे नवीन इमारत उभारावी, सेवा रस्त्याच्या प्रस्तावास मंजूरी द्यावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी या वेळी सचिन सातव यांनी केली. प्रवीण शिंदे यांनीही या बाबत काही सूचना केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.