डॉ. आढाव यांच्याकडून महामंडळाकडून विविध मागण्यांचे निवेदन
पुणे – राज्यातील कामगार विभागातील रिक्त पदे भरावीत, राज्याचे माथाडी सल्लागार मंडळ नियुक्त करण्यात यावे, सर्व महसूल विभागातील कामगार प्रतिनिधींना प्रतिनिधित्व मिळावे, स्थानिक माथाडी मंडळाची रचना तातडीने करावी आदी मागण्यांबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले.
बारामती हॉस्टेल येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट डॉ. बाबा आढाव यांनी घेत चर्चा केली. यावेळी, कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे उपस्थित होते.
माथाडी मंडळाने हप्ताची कपात पूर्वीप्रमाणे करावी याबाबतचे आदेश राज्यशासनाने त्वरित काढावे, कष्टकऱ्यांना आपत्कालीन स्थितीत विमा संरक्षण उपलब्ध करून द्यावे, राज्यातील तोलणारांबाबत सुनील पवार समितीचा अहवाल स्वीकारावा तसेच राज्यशासनाने महाधिवक्ता यांच्यामार्फत बाजू मांडून तोलणारांचा रोजगार वाचवावा, राज्यातील शासकीय धान्य गोदामातील कंत्राटी पद्धत बंद करण्यात यावी, राज्यातील माथाडी मंडळे जीएसटीमधून वगळावीत, हमालांच्या मजुरीमधून टीडीएस कपात केला जाऊ नये आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.