धायरीतील “ती’ टाकी पालिकेसाठी अडचण

निधी नसल्याने तहान टॅंकरवरच भागवावी लागणार

टाकी असून बनली अडचण

धायरीतील ही टाकी जिल्हा प्रशासनाने महापालिकेच्या ताब्यात दोन वर्षांपूर्वी दिली असली तरी त्याचा अद्याप वापरच झालेला नसल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले. या टाकीला अवघ्या दोन वर्षांत गळती लागलेली असून तिच्या दुरुस्तीसाठी सुमारे 5 लाखांचा खर्च येणार आहे. या शिवाय, या टाकीला इनलेट व आऊटलेट यंत्रणा बसविण्यासह त्याच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी सुमारे 5 ते 6 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तर या कामासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात एक रुपयाचीही तरतूद केलेली नाही. त्यामुळे यावर्षी हे काम करणे अशक्‍यच असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तर दुसऱ्या बाजूला महापालिकेकडून समान पाणी योजनेअंतर्गत नवीन टाक्‍या बांधण्यात येत असून त्यांची क्षमता या टाकीच्या पाच पट आहे. मात्र, त्याचे काम पूर्ण होणे आणि प्रत्यक्ष जलवाहिनी टाकण्यास सुमारे तीन ते चार वर्षांचा कालावधी जाईल. त्यामुळे प्रशासनास या टाकीचाच वापर करावा लागणार आहे. त्यामुळे समान पाणी योजनेचे पाणी येईपर्यंत केवळ एक ते दोन वर्षांसाठी पालिकेस या टाकीसाठी मोठा खर्च उचलावा लागणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.

पुणे  – धायरी गावच्या पाणी पुरवठ्यासाठी जिल्हा परिषदेकडून 2015 मध्ये बांधण्यात आलेली पाण्याची टाकी महापालिकेसाठी चांगलीच अडचणीची बनली आहे. अवघ्या चार वर्षांपूर्वी बांधलेल्या या टाकीला चक्‍क गळती लागलेली असून या टाकीतून जलवाहिनी टाकण्यासाठी प्रशासनास 5 ते 6 कोटींचा खर्च करावा लागणार आहे. त्यातच टाकीची क्षमता अवघ्या 5 लाख लिटरची असल्याने ती प्रशासनासाठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे तिचा वापर सुरू करण्यासाठी अजून वर्षभराचा कालावधी लागणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

धायरी गावातील पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी मागील आठवड्यात हांडामोर्चा काढला होता, तर पालिकेच्या मुख्यसभेतही या भागातील नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी महापौर मुक्‍ता टिळक यांनी या भागाची पाहणी केली. यावेळी या ठिकाणी जिल्हा परिषदेने 2015 मध्ये पाण्याची टाकी बांधली असली तरी त्याला पाणी जाण्यासाठी व येण्यासाठी जलवाहिनीच नसल्याने तसेच पाणी वितरणाची यंत्रणाही नसल्याने ही टाकी पडून असल्याचे समोर आले. त्यामुळे पालिकेकडून ही टाकी वापरात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here