शिक्षण आयुक्तांची डोकेदुखी वाढल्यानंतर काढला उपस्थित राहण्याचा फतवा
पुणे – शिक्षण विभागातील विविध कार्यालयांचे प्रमुख सतत कार्यालयातून गायबच असल्याने शिक्षक आयुक्तांना भेटण्यासाठीच सतत गर्दी होऊ लागली आहे. यामुळे शिक्षण आयुक्तांची डोकेदुखी वाढली असून, त्यांनी सर्वच कार्यालय प्रमुखांना कार्यालयात उपस्थित राहण्याबाबतचा फतवाच काढला आहे.
राज्यातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्थांचे व संघटनांचे पदाधिकारी, पालक, आंदोलनकर्ते हे सतत कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त शिक्षण विभागाच्या प्रमुख कार्यालयांकडे धाव घेतात. मात्र, बऱ्याचदा त्यांच्या पदरी निराशाच पडले. “कार्यालय प्रमुख बैठक, तपासणी, कार्यक्रमाला गेले आहेत’ अशी उत्तरे संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सांगितली जातात हे आश्चर्यकारक आहे. बऱ्याच जणांनी कार्यालय प्रमुख भेटत नसल्याच्या तक्रारी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे दाखल झालेल्या आहेत. या तक्रारीत तथ्य असल्याचेही उघड झालेले आहे.
कोणीच प्रमुख अधिकारी भेट नसल्याने सर्वजण थेट शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांची भेट घेण्यासाठी तळ ठोकत असल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळत आहे. शिक्षण आयुक्तांना तक्रारदारांची निवेदने घेण्यात व त्यांची गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठीच खूप वेळ द्यावा लागतो आहे. यामुळे इतर महत्त्वाची कामे मार्गी लावण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. शिक्षण आयुक्तांनी तक्रारदारांच्या तक्रारींची गंभीर्याने दखल घेतली आहे. कार्यालयात दाखल होणारी प्रकरणे वेळेत मार्गी लागावीत यासाठी सर्वच कार्यालय प्रमुखांनी किमान दर सोमवारी तरी कार्यालयात उपस्थित रहावे, असे आदेश शिक्षण आयुक्तांनी जारी केले आहेत.
पूर्वपरवानगी बंधनकारक
काही अपवादात्मक परिस्थितीत कार्यालय प्रमुखांना सोमवारी कार्यालयात उपस्थित राहणे शक्य नसल्यास त्यांना शिक्षण आयुक्तांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. कार्यालयातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी तरी सोमवारी उपस्थित राहण्याची दक्षता घ्यावी, असेही शिक्षण आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करून केलेल्या कार्यवाहीचा अहवालही शिक्षण आयुक्त कार्यालयात सादर करण्याची सक्ती करण्यात आलेली आहे.