करोनामुळे पोलीस दलातील हालचाली यंदा थंडावल्या
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर चालू वर्षातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत सर्वसाधारण बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. करोनाच्या कामात सातत्य ठेवण्यासाठी बदल्या न करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आले आहे. त्यामुळे शहर पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या यंदा सर्वसाधारण बदल्या होणार नाहीत. यामुळे चांगल्या ठिकाणी बदली होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग आणि “सेटिंग’ लावून बसलेल्यांचे वांदे होणार आहेत.
करोनाच्या कामात सातत्य राहावे म्हणून, शासनाने या विभागातील अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता पुणे पोलीस आयुक्त कार्यालयानेदेखील याबाबत सुरुवातीला बदल्यास पात्र असलेल्या अधिकाऱ्यांची यादी मागवली होती. मात्र, आता शासन आदेशानुसार पुणे पोलीस आयुक्तालयातील शिपाई ते सहायक पोलीस फौजदार यांच्या बदल्या केल्या जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बदलीस पात्र असलेल्यांची माहिती सादर करू नये, असे आदेशात म्हटले आहे.
दिवसेंदिवस वाढणारा करोनाचा प्रसार रोखण्यासाठी इतर विभागाप्रमाणे पोलीस दल चोवीस तास रस्त्यावर कर्तव्य पार पाडत आहे. या लढत्यात पोलिसांची जबाबदारीदेखील मोठी आहे. अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांना करोनासंदर्भात विशेष कामे देण्यात आली आहे. त्यामुळे कदाचित बदल्यांना स्थगिती दिल्याची शक्यता आहे.