पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एप्रिल-मे मध्ये या परीक्षा होणार आहेत.
दरवर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा या फेब्रुवारी-मार्च मध्ये होत असतात. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. राज्य शासनाने मान्यता दिल्यानुसार आता वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. बारावीच्या सर्वसाधारण व द्विलक्षी विषयाच्या व व्यवसाय अभ्यासक्रमाच्या पुनर्रचित व जून्या अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत होणार आहेत. दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत होणार आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने व विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दिनांकनिहाय सवीस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
या वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे व राज्य मंडळाकडे 22 फेब्रुवारी पर्यंत लेखी स्वरुपात पाठवाव्या लागणार आहे. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरुपात देण्यात येणार वेळापत्रक अंतिम असणार आहे. छापील वेळापत्रकावरुन परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉटसऍप किंवा इतर माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये, असेही नमूद करण्यात आले आहे.