प्रो कबड्डी लीगच्या प्रतिष्ठित मंचावर आपण एकाच कुटुंबातील अनेक खेळाडूंना खेळताना पाहिले आहे. या यादीत धर्मराज बंधू, देसाई बंधू, नरवाल बंधू, छिल्लर चुलत भाऊ इत्यादी भाऊ आणि चुलत भावांच्या अनेक जोड्यांचा समावेश आहे. मात्र यंदाच्या प्रो कबड्डी लीगच्या हंगामात आपल्याला एकाच कुटुंबातील दोन पिढ्या एकाच वेळी एकाच संघाकडून मैदानात उतरताना पहायला मिळणार आहेत.
अर्थतातच आपण दबंग दिल्लीचा कर्णधार जोगिंदर नरवाल आणि त्याचा मुलगा विनय यांच्याविषयी बोलत आहोत. दबंग दिल्लीचे नेतृत्त्व करत असलेला जोगिंदर नरवाल प्रो कबड्डीचे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा बाजी लावणार आहे. आणि यावेळी त्याच्यासोबत त्याचा स्वतःचा मुलगा विनय नरवाल त्याच्या साथीला असणार आहे.
विनय कुमार नरवालला न्यू यंग प्लेयर कोट्याद्वारे दबंग दिल्ली संघात समाविष्ट करण्यात आले आहे. 19 वर्षीय विनय बचावपटू म्हणून वडील जोगिंदरच्या नेतृत्त्वाखाली प्रथमच प्रो कबड्डी लीगमध्ये खेळणार आहे. विनय त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्याच्यासारखे दिग्गज कबड्डीपटू म्हणून ओळख बनवण्यासाठी उत्सुक आहे.
विनयही देखील वडील जोगिंदर नरवालप्रमाणेच डाव्या कोपर्यावर बचावपटू म्हणून खेळतो. विनयने गेल्या काही वर्षांपासून दबंग दिल्लच्या युवा सेटअपमध्ये प्रशिक्षण घेत आहे आणि त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला आता पहिल्यांदाच मुख्य संघात संधी मिळाली आहे.
जोगिंदर नरवाल हा सध्या प्रो कबड्डीमधील सर्वात अनुभवी सक्रिय खेळाडूंपैकी एक आहे. दबंग दिल्ली संघाची लोकप्रियता अचानक वाढण्यात त्याच्या कर्णधारपदाचा मोठा वाटा होता. 39 वर्षीय जोगिंदरने प्रो कबड्डी कारकीर्द बेंगळुरू बुल्स, पुणेरी पलटण, यू मुंबा आणि दबंग दिल्लीकडून खेळताना 83 सामन्यांमध्ये 173 टॅकल पॉइंट्स मिळविले आहेत.
यंदाच्या हंगामात विनयच्या पदार्पणाच्या शक्यता कमी असल्या तरी त्याचा पहिला प्रो कबड्डी हंगामात शिकण्यासारखे खूप काही असणार आहे. दबंग दिल्लीमध्ये जोगिंदर व्यतिरिक्त, मनजीत छिल्लर, जीवा कुमार आणि अर्जुन पुरस्कारप्राप्त संदीप नरवाल यांसारख्या अनेक अनुभवी बचावपटूंचा समावेश आहे. त्यामुळे या दिग्गजांचा अनुभव विनयला पुढील कारकिर्दीसाठी महत्वाचा ठरणार आहे.
प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेला दबंग दिल्ली त्यांच्या यंदाच्या स्पर्धेतील पहिला सामना आज (गुरुवारी) खेळणार आहे. गेल्या मोसमात दिल्लीला आपले पहिले विजेतेपद मिळवण्याची संधी होती. मात्र, अंतिम सामन्यात दिल्लीला बंगाल वॉरियर्सकडून पराभव पत्करावा लागल्याने विजेतेपदाचे स्वप्न भंगले.
जोगिंदर नरवालची प्रो कबड्डी लीगमधील कामगिरी
सामने- 82
एकूण गुण- 177
बचाव करताना मिळवलेले गुण- 173
चढाई करताना मिळवलेले गुण- 4