मुंबई :- प्रो-कबड्डीचे आयोजन करणाऱ्या मशाल स्पोर्टस कंपनीने 2021 ते 2025 अशा पाच वर्षाच्या कालावधीसाठी प्रो-कबड्डीच्या प्रक्षेपण हक्काचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रक्रियेला गुरूवारपासून सुरवात झाली असून हे हक्क खरेदी करण्यासाठी निविदा सादर करताना कंपनीना मुळ कागदपत्रांसह ठराविक अनामत रक्कम भरावी लागणार आहे. यासाठी भारतीय कंपनी असेल, तर त्यांना अडीच लाख रुपये भरावे लागतील, तर परदेशी कंपनीला साडेतीन हजार डॉलर भरावे लागतील.
प्रो कबड्डीची आतापर्यंत सात मोसम झाले असून, आठवा मोसम करोनामुळे अद्याप संकटात आहे. पहिली सात वर्षे स्टार स्पोर्टसने लीगचे प्रक्षेपण केले होते. मात्र, त्यांच्याशी असलेला करार संपला असल्यामुळे ही प्रक्रिया नव्याने राबवली जात आहे. लीग मधील बारा संघांचे मालक आणि स्टार यांच्यात महसूल वाटून घेण्यावरून बोलणी फिसकटल्यामुळेच मशाल स्पोर्टसला हा निर्णय घ्यावा लागला आहे.
अर्थात, हे हक्क पुन्हा एकदा स्टार स्पोर्टसकडेच येण्याची शक्यता अधिक आहे. लीग सुरू करताना भारतीय कबड्डी महासंघाबरोबर काय करार झाला याची कुणालाच काही माहिती नाही. त्यामुळे हा लिलाव होताना भारतीय कबड्डी महासंघाची भूमिका काय असेल हे अजून समोर आलेले नाही. विशेष म्हणजे महासंघावर कुणाचीच सत्ता नाही. महासंघाचे काम पाहण्यासाठी सध्या न्यायालयाने माजी न्यायाधीश एस.पी. गर्ग यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.