Pro Kabaddi 2024 (Gujarat Giants Vs Bengal Warriorz) – प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या मोसमात राम मेहर सिंगच्या गुजरात जायंट्सने अखेर आपला दुसरा विजय संपादन केला आहे. संघाने बंगाल वॉरियर्सचा ४७-२८ असा दारूण पराभव केला. गुजरात जायंट्सने सलग सात पराभवानंतर हा विजय मिळवला आहे. या सामन्यात गुमान सिंगने शानदार खेळ करत १७ गुण मिळवले. तर बंगाल वॉरियर्ससाठी कर्णधार फझल अत्राचली आणि मनिंदर सिंग वाईटरित्या फ्लॉप ठरले.
Singh is King 💪#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #GujaratGiants #BengalWarriorz pic.twitter.com/Pplr5ex1wj
— ProKabaddi (@ProKabaddi) November 13, 2024
बुधवारी झालेल्या लढतीत गुजरात संघाने पहिल्यापासूनच आक्रमक धोरण स्वीकारले. मध्यंतराला गुजरात संघाने २४-१३ अशी ११ गुणांची आघाडी घेतली होती. गुजरात संघाने चढाईतून ११ तर पकडीतून ८ गुणांची कमाई केली. याचबरोबरीने बंगाल संघावर लोन चढविताना ४ गुण वसूल केले. बंगाल संघाला मात्र चढाईतून १० तर पकडीतून केवळ ३ गुणाचीच कमाई कारता आली.
दुसऱ्या सत्रात देखील गुजरातने वर्चस्व राखले. दुसऱ्या सत्रात गुजरातने २३ तर बंगालने १५ गुणांची कमाई केली. दुसऱ्या सत्रात देखील गुजरातने बंगाल संघावर लोन चढविताना २ गुण मिळविले. चढाईतून १३ तर पकडीतून ८ गुण मिळविताना गुजरात संघाने विजय साकारला.
Pro Kabaddi 2024 : दबंग दिल्ली vs पुणेरी पलटण सामना बरोबरीत, आशू मलिकने शेवटच्या क्षणी केली कमाल…
गुजरात संघाच्या गुमान सिंगने आज धडाकेबाज खेळ करताना तब्बल १७ गुणांची कमाई केली. गुमान सिंगला प्रतीक दहिया, हिमांशू व जितेंदर यादव यांनी प्रत्येकी ६ गुण मिळविताना सुरेख साथ दिली. बंगाल संघाकडून नितीन कुमारने ११ गुण मिळविताना सुपर १० पूर्ण केले. मात्र इतरांची साथ न मिळाल्याने तो संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही.