पुणे – 2014 मध्ये सुरू झालेल्या प्रो कबड्डी लीगची लोकप्रियचा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे खेळाडूंची अविश्वसनीय कामगिरी, काही उत्कृष्ट विक्रम आणि खेळाचे सोपे नियम.
40 मिनिटांत संघाचा विजय निश्चित करणार्या या खेळाचा प्रो कबड्डी लीगमध्ये आता 8वा हंगाम सुरु आहे. प्रो कबड्डी लीगमध्ये खेळल्या गेलेल्या 7 हंगामात आतापर्यंत असे अनेक विक्रम प्रस्थापित झाले आहेत जे येणार्या काही वर्षांत मोडणे सोपे असणार नाही. या लेखातून आपण प्रो कबड्डी लीगमधील 5 विक्रमांवर नजर टाकणार आहोत.
एका सामन्यात सर्वाधिक गुण
स्पर्धेच्या 7व्या हंगामात, हरियाणा स्टीलर्सचा विरुद्ध बेंगळुरू बुल्स यांच्यातील त्या सामन्यात बंगळुरुकडून खेळताना पवन सेहरावतने चढाई करताना तब्बल 39 गुण मिळवले, जे प्रो कबड्डी लीगमध्ये आतापर्यंत एका सामन्यात चढाईपटूने मिळवलेले सर्वाधिक गुण आहेत.
या सामन्यात पवनने 38 वेळा चढाई केली या तो 37 वेळा गुण मिळवण्यात यशस्वी ठरला. यापूर्वी हा विक्रम प्रदीप नरवालच्या नावावर होता, त्याने 5व्या हंगामात हरियाणा स्टीलर्सविरुद्ध 34 गुण मिळवले होते.
एका हंगामात सर्वाधिक गुण
डुबकी किंग म्हणून ओळखला जाणारा 24 वर्षांचा परदीप नरवाल प्रो कबड्डी लीगमध्ये सलग दोन वेळा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा पुरस्कार मिळवणारा एकमेव खेळाडू आहे.
स्पर्धेच्या 5व्या हंगामात परदीप नरवालने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत 26 सामन्यांमध्ये 369 गुणांची लयलुट केली होती.
याचबरोबर तो स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक गुण मिळवणार खेळाडू ठरला. पुढील काळात एकाच हंगामात इतके गुण मिळवत परदीपचा विक्रम मोडणे कोणत्याही खेळाडूसाठी सोपे नसणार आहे.
एका हंगामात बचावपटू म्हणून सर्वाधिक गुण
नितेश कुमारने आपल्या प्रो कबड्डी लीग कारकिर्दीचा श्रीगणेशा 5व्या हंगामात यूपी योद्धाकडून केला. आपल्या पहिल्या आणि स्पर्धेच्या 5व्या हंगामात समाधानकार कमगिरी करणार्या नितेशने 6व्या हंगामात आपल्या दमदार कामगिरीने सर्वांना चिकीत केले. उजव्या कोपर्यावर बचावपटू म्हणून खेळणार्या नितेशने या हंगामात 25 सामन्यांत बचाव करताना 100 गुण मिळवले.
याचबरोबर प्रो कबड्डीच्या इतिहासात बचाव करताना 100 गुण मिळवणारा तो पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला. इतकेच नव्हे तर इतर कोणत्याही खेळाडूला आतापर्यंत एका हंगामात बचाव करताना 90 गुणही मिळवता आलेले नाहीत.
एका चढाईत सर्वाधिक गुण
स्पर्धेच्या 5व्या हंगामात हरियाणा स्टीलर्स विरुद्धच्या सामन्यात, परदीप नरवालने एकाच चढाईत 8 गुण घेत प्रो कबड्डीच्या इतिहासात आपले नाव कोरले होते. एका चढाईत चढाईपटूला सर्वाधिक 8 गुण मिळवता येतात आणि परदीप
अशी कमागिरी कारणारा एकमेव चढाईपटू आहे. या विक्रमात दुसर्या स्थानीही परदीपच आहे. यावेळी त्याने 1 बोनस गुण आणि 5 बचावपटूंना बाद करत 6 गुणांची कमाई केली होती.
पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक गुण
प्रो कबड्डी लीगचा दुसर्या हंगामापासून भाग असलेल्या मराठमोळ्या कोल्हापूरकर सूरज देसाईला, 7व्या हंगामात तेलुगू टायटन्सकडून पदार्पणाची संधी मिळाली. त्याच्या या पहिल्याच सामन्यात सुरजने दंबंग दिल्ली विरुद्ध खेळताना
तब्बल 18 गुण पटकावत पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक गुण मिळवण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला. हा विक्रम यापूर्वी त्याचा भाऊ सिद्धार्थच्या नावावर होता, त्याने सहाव्या हंगामात त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात 15 गुण मिळवले होते.