प्रियुचि प्राणेश्‍वरी

प्रीती म्हणजे काय? द्रष्टा आणि दृश्‍य, पुरुष आणि स्त्री, प्रियू आणि प्राणेश्‍वरी यांच्यामध्ये जी आवडी आहे, आवड आहे त्या आवडीच्या सरोभरीने सळसळलेले असे अखंड, अनावर आकर्षण म्हणजे प्रीती. आपण जगामध्ये पाहतो द्रष्टा हा दृष्याकडे आकर्षित होतो पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये आकर्षण आहे. जेव्हा खरी, उत्कट अशी प्रीती असेल तेव्हा प्रियुच प्राणेश्‍वरी होतो. त्यांच्यामध्ये एकप्रकारची आवड आहे त्या आवडीने त्यांची जी प्रीती आहे त्या प्रीतीने त्यांचे जीवन सळसळलेले असतं वगैरे असे ज्ञानदेव आपल्या अनुभवामृत या ग्रंथात सुरुवातीलाच म्हणतात. असे मत स्वामी उमानंद सरस्वती यांनी अनुभवामृत बोधेश्‍वरी या ग्रंथात मांडले आहे.

जगाला आज सर्वाधिक कसली गरज असेल, तर ती प्रेमाची आहे. प्रत्येक माणूस प्रेमाचा भुकेला आहे. आजच्या युगात जे चित्र आपण पाहतोय ते ज्ञानदेवांनी सातशे वर्षांपूर्वी पाहिलं असणार आणि म्हणून ज्ञानदेवांनी अनुभवामृत या आपल्या ग्रंथात प्रारंभीच्या ओव्यात विवेक, वैराग्य, ब्रह्म, माया, भक्‍ती या रूढ शब्दाचे अर्थाचे कुठलीही शब्द न वापरता प्रीतीची भाषाच वापरली.

आज माहिती तंत्रज्ञानाने जग जवळ येत आहे पण त्याचवेळी अणुयुद्धाच्या भीतीची छाया गडद होत आहे. एकूणच या परिस्थितीने दैनंदिन जीवनातही सामान्य माणसाला असुरक्षित वाटू लागले आहे. ही असुरक्षिततेची भावना, ही भीती यावर आपल्याला तेव्हाच मात करता येईल जेव्हा आपल्या अंतःकरणात ज्ञानदेवांना हवे असलेल्या आधुनिक प्रीतीचा उदय होईल. या प्रीतीचा अनुभव घेण्यासाठीच अनुभवामृत या ज्ञानदेवांच्या ग्रंथाचा खरा बोध, अभ्यासच व्ह्यायला हवा.
प्रीती सर्वांमध्ये आहे पण आज आपल्याला अंतकरणातली प्रीती पूर्वभ्रम संस्कारांनी आवरणात झाली आहे किंवा आवरणामुळे गोठली आहे. खरी प्रीती आपल्याला माहीतच नाही. आपल्याला व्यवहारी, स्वार्थी प्रेम तेवढे माहीत आहे. या ग्रंथाचा हवा तसा बोध, तसा अभ्यास आपल्याकडून झाला तर मात्र आपोआप मुद्दाम प्रयत्न न करता आत्मपरीक्षणाची प्रक्रिया आपल्या अंतःकरणात सुरू होईल.

एकदा काही प्रक्रिया सुरू झाली की मग पूर्वभ्रम संस्कारांची आवरण बाजूला होतील आणि प्रीतीचे अनावरण होईल. गोठलेली प्रीती प्रवाहित होईल. म्हणजेच प्रीतीचा उद्‌भव होईल प्रीतीचा उद्‌भव झाल्याची खूण काय? तर सर्वांबद्दल प्रेम वाटू लागेल. आपल्याशी शत्रुत्वाने वागणाऱ्याबद्दलसुद्धा. मग आपण आपल्या स्वार्थासाठी कोणाचा गैरवापर करू शकणार नाही. या प्रीतीमध्ये स्वातंत्र्य, समता, मानवता आणि सर्जनशीलता हे मूल्य अंतर्भूत होतात. समाजकारणी विचारवंत या मूल्यांचा उद्‌घोष करीत असतात. पण ही मूल्य मानवाकडून प्रकट होण्यासाठी त्यांच्यात प्रीतीचा उदय झाला पाहिजे, माणसाचे अंतःकरण बदलले पाहिजे म्हणजे हेच आणि मग ज्ञानदेवांना अभिप्रेत ईश्‍वरनिष्ठ आपल्यातूनच प्रगट होईल.

व्यक्‍तीव्यक्‍तीतील वाद, भांडण, कौटुंबिक कलह, समाजातील दोन गटातील संघर्ष, दोन राष्ट्रातील युद्ध, महायुद्ध या सर्वांच्या मुळाशी खऱ्या प्रीतीचा अभाव, अहंकार- मीपण. निष्णात वैद्य लक्षणांवर उपचार करीत नाही तर रोगाची मुळेच उखडून टाकतो. ज्ञानदेव असेच निष्णात भवरोगवैद्य आहेत अनुभवामृत ग्रंथ लिहिण्याचा त्यांचा उद्देश हाच आहे की अभ्यासकांच्या छोट्या “अहंमचे’ समर्पण घडून यावे एकदा का छोट्या “अहंमचे’ समर्पण घडून आलं की जीवाला सुखाच्या साम्राज्यावर अभिषेक घडेल व विश्‍व प्रीतीची भावना उत्पन्न होऊन खऱ्या अर्थी वसुधैव कुटुंबकंम्‌चे स्वप्न साकार होईल.

प्रेम म्हणजे काही घेणं नसतं
प्रेम म्हणजे नुसते देणे असते
प्रेम म्हणजे कोरडे शब्द नसतात
प्रेम म्हणजे फक्‍त भावना असतात

प्रेम म्हणजे मी तू पणा नसतं
प्रेम म्हणजे मी तूच होऊन जाणं असतं
प्रेम म्हणजे माझे मन तुझे होणे असतं
प्रेम म्हणजे तुझे मन माझे होणे असतं

प्रेम म्हणजे जीव देणे नसते
प्रेम म्हणजे जीव लावणे असते
प्रेम म्हणजे अपेक्षांचे ओझे नसते
प्रेम म्हणजे मनातले न सांगताही ओळखणे असते

प्रेम म्हणजे जीवाला लागलेली आस
प्रेम म्हणजे एका जीवाला दुसऱ्या जीवाचा ध्यास
प्रेम म्हणजे एका जीवाला दुसऱ्या जीवाचा चहूकडे भास
प्रेम म्हणजे सुगंधी जीवनाचा सुवास

प्रेम म्हणजे आंतरिक ओढ असते
प्रेम म्हणजे आत्म्याचे आत्म्याशी मीलन असते.

अजय बाविस्कर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.