मुंबई – बॉलीवूडमधील देशी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा “द मॅट्रिक्स रेजरेक्शन्स’ या हॉलीवूडमधील चित्रपटातून जगावर अधिराज्य गाजवण्यास सज्ज झाली आहे. आता प्रियांका चोप्राने “द मॅट्रिक्स रेजरेक्शन्स’चे पोस्टर शेअर केले आहे.
हे पोस्टर शेअर करत प्रियांकाने लिहिले की, “द मॅट्रिक्स रेजरेक्शन्स’च्या या नवीन पोस्टरसह मॅट्रिक्समध्ये परत या. या ख्रिसमसला चित्रपटगृहात आणि एचबीओ मॅक्सवर पाहू शकतो. प्रियांका चोप्राच्या पोस्टरमध्ये कॅरी-नी मॉस, जाडा पिंकेट स्मिथसह आंतरराष्ट्रीय कलाकार केनू रीव्हज आहेत. मात्र, हे पोस्टर पाहून प्रियांकाचे चाहते निराश झाले आहेत.
या पोस्टवर प्रियांकाचे चाहते तिला विचारत आहेत की, तू कुठे आहेस, पोस्टरमध्ये नाही? प्रियांकाच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. सप्टेंबर महिन्यात चित्रपटाच्या निर्मात्यांनी पहिला ट्रेलर प्रदर्शित केला. या ट्रेलरमध्ये प्रियांकाच्या एका झलकमधील लूक चाहत्यांना पसंत पडत आहे.
हा चित्रपट 22 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रियांका सध्या बॉलीवूड आणि हॉलीवूड दोन्ही चित्रपट करत आहे. बॉलीवूडमध्ये ती “द व्हाईट टायगर’ आणि “द स्काय इज पिंक’मध्ये दिसली होती. यासोबतच ती शेवटची हॉलीवूड फिल्म “वी कॅन बी हिरोज’मध्ये दिसली होती.