नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘विषारी साप’ संबोधल्याच्या वक्तव्यानंतर आता त्यांचा मुलगा प्रियांक खर्गे यांनी पंतप्रधानांना ‘नालायक’ अशी उपमा दिली आहे. प्रियांक हे माजी मंत्री आहेत आणि यावेळी कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवत आहेत. अनुसूचित जाती समाजाच्या आरक्षणाबाबत पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षाने संभ्रम निर्माण केला असल्याचे ते म्हणाले.
प्रियांक खर्गे लोकांना म्हणाले, “जेव्हा पंतप्रधान मोदी गुलबर्गा येथे आले तेव्हा त्यांनी बंजारा समाजाच्या लोकांना काय सांगितले? तुम्ही सर्व घाबरू नका. बंजाराचा एक मुलगा दिल्लीत बसला आहे. असा ‘नालायक’ बेटा दिल्लीत बसला असेल तर तुमचे कुटुंब कसे चालणार ? असा सवाल यावेळी प्रियांका यांनी उपस्थित केला.
प्रियांका पुढे म्हणाले, “आम्ही हे म्हणतोय कि, ते (पंतप्रधान) स्वतःला बंजारा समाजाचा मुलगा म्हंटले आणि आरक्षणाबाबत संभ्रम निर्माण करून गेले. हा बंजारा समाजावर अन्याय झाला नाही का? येडियुरप्पा यांच्या घरावर दगडफेक का करण्यात आली? कलबुर्गी आणि जेवारगीमध्ये बंद का पाळण्यात आला? आज आरक्षणाबाबत संभ्रम आहे.”
यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी थेट पंतप्रधानांवर टीका केली होती. त्यानंतर आता त्यांचे पुत्र प्रियांक यांनी देखील पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.कर्नाटकमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी सर्व पक्ष आपली संपूर्ण ताकद लावून प्रचारात उतरले असल्याचे पाहायला मिळाले.