उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत प्रियांका हाच कॉंग्रेसचा चेहरा

नवी दिल्ली  – उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत प्रियांका गांधी याच कॉंग्रेसचा चेहरा असतील अशी माहिती कॉंग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख पी.एल. पुनिया यांनी दिली. ते म्हणाले की सध्या या राज्यात त्या सर्वात लोकप्रिय राजकीय नेत्या आहेत.

पुनिया यांची नुकतीच पक्षाच्या उत्तरप्रदेशच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ते म्हणाले की मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार जाहीर करण्याची पक्षाची प्रथा नाही. असे असले तरी उत्तरप्रदेशात भाजपच्या विरोधात प्रियांकांसारखा लोकप्रिय चेहरा पक्षाकडे आहे, त्याचा पक्षाला लाभच होणार आहे.

उत्तरप्रदेशात आता भाजप आणि कॉंग्रेस अशीच सरळ लढाई होणार असून या राज्यात समाजादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी हे मागे पडले आहेत असे ते म्हणाले. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी हे पक्ष स्पर्धेतच नाहीत असे सध्याचे चित्र आहे असेही त्यांनी नमूद केले. प्रियांकांनी उत्तप्रदेशात लखीमपुर खेरी, भैरच येथील घटनांच्यावेळी मोठा संघर्ष करून तेथे यश मिळवले आहे.

या आधीही त्यांनी सोनभद्र, उन्नाव आणि हाथरसच्या प्रकरणातही सामान्यांच्या बाजूने लढा दिला आहे. त्यांनी न्यायासाठी चालवलेली लढाई जनतेच्या पसंतीस उतरली आहे. त्यामुळे निदान आज तरी प्रियांकासारखा लोकप्रिय नेता उत्तरप्रदेशात नाही. आमच्यासाठी त्या 24 तास उपलब्ध असलेल्या नेत्या आहेत ही पक्षाची मोठी जमेची बाजू आहे असेही त्यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.