रोड शोने प्रियांका गांधी यांच्या मिशन यूपीचा प्रारंभ 

लखनौ – कॉंग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सोमवारी येथील रोड शोच्या माध्यमातून त्यांच्या मिशन यूपीचा प्रारंभ केला. जवळ येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या कॉंग्रेसच्या उत्तरप्रदेशातील प्रचाराची सुरूवात म्हणून या रोड शोकडे पाहिले जात आहे.

रोड शोवेळी प्रियांका यांच्या समवेत त्यांचे बंधू आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तसेच पश्‍चिम उत्तरप्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आलेले पक्षाचे आणखी एक सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे होते. रोड शोवेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांबरोबरच स्थानिकांनी मोठी गर्दी केल्याने प्रियांका यांच्या मिशन यूपीचा दिमाखात प्रारंभ झाल्याचे चित्र समोर आले. विमानतळ ते प्रदेश कॉंग्रेसचे मुख्यालय असा सुमारे 25 किलोमीटरचा प्रवास रोड शोने केला. नवी जबाबदारी हाती घेऊन आलेल्या प्रियांका यांच्या आगमनाने कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह संचारलेला दिसला.

प्रियांका आणि ज्योतिरादित्य या उत्तरप्रदेशातील कॉंग्रेसच्या नव्या प्रभारींचे स्वागत करण्यासाठी लखनौमध्ये सर्वत्र पक्षाचे फलक आणि झेंडे लावण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण शहर जणू कॉंग्रेसमय बनून गेले होते. काही फलकांवर प्रियांका यांना थेट दुर्गामातेच्या रूपात दाखवण्यात आले. तर काही फलकांच्या माध्यमातून त्यांचे आजी आणि माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्याशी साम्य असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न झाला. आता पुढील तीन दिवस प्रियांका आणि ज्योतिरादित्य कॉंग्रेसच्या येथील प्रदेश मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

उत्तरप्रदेशात कॉंग्रेसचे सरकार स्थापण्याचे उद्दिष्ट-राहुल

रोड शोवेळी भाषण करताना राहुल यांनी उत्तरप्रदेशात कॉंग्रेस फ्रंटफुटवर खेळणार असल्याच्या भूमिकेचा पुनरूच्चार केला. प्रियांका आणि ज्योतिरादित्य यांच्यावर केवळ लोकसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. उत्तरप्रदेशात कॉंग्रेसचे सरकार स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले. यावेळी राफेलच्या मुद्‌द्‌यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करताना राहुल यांनी उपस्थितांकडून बऱ्याचवेळा चौकीदार चोर है असे वदवून घेतले. 

Leave A Reply

Your email address will not be published.