प्रियांका गांधी यांची मोदींवर टीका; म्हणाल्या, ‘गोवर्धन पर्वत विकायलाही…’

मथुरा – केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने सगळे विकायला काढायची गोळी घेतली आहे. गोवर्धन पर्वत सांभाळून ठेवा. या सरकारचा काही भरवसा नाही, तोही विकायला काढतील अशा शब्दांत कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना कॉंग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. मथुरेतील पालीखेडा येथे त्यासंदर्भात एका किसान महासभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रियांका यांचे जोरदार भाषण झाले व उपस्थितांनीही त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच टीकेचा रोख ठेवला.

आपण भगवान श्रीकृष्ण यांच्या नगरीतून बोलत आहोत असे नमूद करून त्या म्हणाल्या की, केंद्राने संबंधित कृषी कायदे हे केवळ श्रीमंत उद्योगपतींसाठीच तयार केले आहेत. मात्र या सरकारचा अहंकार स्वत: भगवान कृष्णच मोडीत काढतील. त्यांनी इंद्रदेवाचाही अहंकार मोडला होता. गोवर्धन पर्वत उचलून या नगरितल्या गरीब शेतकऱ्यांचे रक्षण केले होते. या सरकारचा अहंकारही तेच मोडतील.

आपल्या मुलांना सीमेवर देशाचे रक्षण करण्यासाठी आज शेतकरी दिल्लीत रस्त्यावर बसले आहेत. सरकारने त्यांची वीज कापली, पाणी कापले, त्यांना मारहाण केली, त्यांची छळवणूक केली. मात्र या शेतकऱ्यांशी मोदी चर्चा करायला वेळ काढू शकले नाहीत. यांचा विवेकच संपला असल्याची टिप्पणी त्यांनी केली.

पेट्रोल डीझेलच्या दरवाढीवरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. कॉंग्रेसने काही केले नाही म्हणून इंधनाचे दर वाढत आहेत असे सरकारचे म्हणणे असल्याची खिल्ली उडवताना प्रियांका म्हणाल्या आमच्या सरकारने काहीतरी वाढवले याचे आभार तरी माना. आम्ही काही तरी बनवले म्हणून आज तुम्हाला ते सगळे विकायला मिळते आहे असे त्यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.